Home Maharashtra प्रियदर्शी सम्राट अशोक बुध्द विहार स्पर्धेंचा पारितोषीक सोहळा थाटात संपन्न… —...

प्रियदर्शी सम्राट अशोक बुध्द विहार स्पर्धेंचा पारितोषीक सोहळा थाटात संपन्न… — चिमूर येथे पार पडलेला स्पर्धेचा पारितोषीक सोहळा ठरलाय प्रेरणादायक आणि उर्जेची भर घालणारा!..

शुभम गजभिये

 विशेष प्रतिनिधी..

         पांढऱ्या शुभ्र वस्त्रात शिस्तीत आलेली बुद्ध विहार समित्यांची पदाधिकारी मंडळी,सुमधुर आवाजात भीम बुद्ध गीतांची पर्वणी,प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून येणाऱ्या बांधवांचे करण्यात आलेले स्वागत,संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेची पडद्यावर प्रदर्शित होत असलेली डाक्यूमेंटरी,पाहुण्यांचे हस्ते प्रकाशित झालेला संस्थेचा कार्य गौरव विशेषांक,पॉकेट दिनदर्शिका,तालुक्यातील सर्व बुद्ध विहारांना भेट दिलेला २२ प्रतिज्ञाचा आकर्षक फलक,स्पर्धेत पारितोषिकप्राप्त बुद्ध विहारांना देण्यात आलेली उल्लेखनिय पारितोषिके आणि ही पारितोषिके टाळ्यांच्या गजरात स्वीकारताना बुद्ध विहार समिती सदस्यांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद हेच प्रियदर्शी सम्राट अशोक स्पर्धेचे आकर्षन व विशेष वैशिष्ट्य ठरले…

      निमित्त होतं वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान आयोजित चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्ध विहार स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचं!

                 चिमूर येथील सुसज्ज मिलन सांस्कृतिक सभागृहात हा आनंददायी सोहळा तालुक्यातील हजारो बंधू – भगिनींच्या उपस्थितीने अविस्मरणीय ठरला. 

       संस्थेचे अध्यक्ष ऍड.भूपेश पाटील यांच्या संकल्पनेतून चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्ध विहार स्पर्धा बुद्ध विहारांसाठी घेण्यात आली.

          स्पर्धेसाठी २० निकष ठरवण्यात आले.या निकषांच्या कसोटीवर उतरलेल्या बुद्ध विहारांना या शानदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.

              बुद्ध विहारे चळवळीची केंद्रे व्हावीत हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते.१९५६ ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षेच्या सोहळ्यात जे भाषण दिलं त्यावरून सम्राट अशोक आदर्श बुद्ध विहार स्पर्धेची संकल्पना सुचल्याचे ऍड.भूपेश पाटील यांनी या सोहळ्यात संवाद साधताना स्पष्ट केले.

        १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला धम्म योग्य रीतीने चालला पाहिजे यासाठी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची निर्मिती केली.त्यांनी बौद्ध बनण्यासाठी तीन महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या होत्या.परंतू आपण त्याकडे दुर्लक्ष केले.

         आपण फक्त राजकारण केलं.आपण धम्मासाठी वेळ दिला असता तर प्रत्येक गावचे बौद्ध विहार सशक्त झाले असते.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेले ग्रंथ बुद्ध विहारांत वाचले गेले तरच सामाजिक बदल होतील,त्यातून आर्थिक,राजकीय बदल होतील.

               बौद्धांच्या सर्वांगिण विकासासाठी गावातील बुद्ध विहारांचं सशक्तीकरण करावं लागेल.युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विहारांसाठी जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नातील विहारे निर्माण झाली तरच सशक्त बौद्ध निर्माण होतील,असे मत अँड.भूपेश पाटील यांनी व्यक्त केले.

             पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी चिमूरच्या नगराध्यक्षा सौ.गीता लिंगायत होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून पारशिवनीचे नगराध्यक्ष दीपक शिवरकर,राहुल घुसे,डॉ.सीमा पाटील आदी उपस्थित होते.

          चिमूर तालुक्यातील ९५ बुद्ध विहारांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

प्रथम क्रमांक…

        या स्पर्धेत प्रथम क्रमांक दीपंकर बुद्ध विहार नेरी ने प्राप्त केला.संगणक संच,२२ प्रतिज्ञा फलक,सन्मानपत्र देऊन या बुद्ध विहाराचा गौरव करण्यात आला. 

द्वितीय क्रमांक…

       धम्मपाल बुद्ध विहार पिपर्डा आणि बुद्ध विहार शिवणपायली यांना प्रत्येकी ५००० रुपयांचा धनादेश,२२ प्रतिज्ञा फलक,सन्मानपत्र असा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार विभागून देण्यात आला.

तृतीय क्रमांक….

          जेतवन बुद्ध विहार विहीरगाव आणि लूंबिनी बुद्ध विहार चिमूर यांना ग्रंथ संच,२२ प्रतिज्ञा फलक,सन्मानपत्र असा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार विभागून देण्यात आला. 

विशेष पुरस्कार…

         बुद्ध विहारातील विशेष उपक्रमांसाठी विशेष पुरस्कार देण्यात आले.यात प्रामुख्याने अंगुलीमाल स्वाभिमानी संकल्प प्रेरणा पुरस्कार सम्यक पंचशील बुद्ध विहार भिसी,जेतवन बुद्ध विहार विहिरगांव,धम्मपाल बुद्ध विहार पिपर्डा यांना देण्यात आला.

माता रमाई पुरस्कार….

         माता रमाई महिला स्वयंसिद्ध पुरस्कार अरहंत अंगुलीमाल बुद्ध विहार पुयारदंड,महामुनी बुद्ध विहार नेरी यांना देण्यात आला.

सांची स्तूप पुरस्कार…. 

       सांची स्तूप प्रतिकृती प्रेरणा पुरस्कार मैत्रेय बुद्ध विहार भिसी,धम्मपाल बुद्ध विहार पिपर्डा,जेतवन बुद्ध विहार विहिरगांव यांना देण्यात आला.

राजगृह प्रेरणा पुरस्कार…

        राजगृह प्रेरणा पुरस्कार महाबोधी बुद्ध विहार गुजगव्हाण यांना तर संकल्प प्रेरणा पुरस्कार परिवर्तन बुद्ध विहार वडसी यांना देण्यात आला.

             डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील बुद्ध विहारे नव्याने घडविण्याच्या जिद्दीने,”भीमाची लेकरं गावागावात परत निघालीती या सोहळ्यातून नवी ऊर्जा,नवी प्रेरणा घेऊन,असे दिसून आले!