Home Social कार्तिकी यात्रा, संजीवन समाधी सोहळा पूर्वनियोजन बैठकीत संपन्न…

कार्तिकी यात्रा, संजीवन समाधी सोहळा पूर्वनियोजन बैठकीत संपन्न…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी – श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन आळंदी नगरीत येत्या १२ ते २० नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या कार्तिकी यात्रा व संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वनियोजन बैठक उपविभागीय अधिकारी, खेड यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी पार पडली.

         या बैठकीत प्रशासन, पोलीस, आरोग्य, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, परिवहन, तसेच संस्थान समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून यात्रेच्या पूर्वतयारीबाबत सर्व विभागांना आपापली कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

         मा.उपविभागीय अधिकारी खेड यांनी आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, दर्शनबारी व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता आणि सुरक्षा या सर्व विभागांनी समन्वय ठेवून कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.

        बैठकीत अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष श्री डी.डी. भोसले-पाटील यांनी दर्शनबारीतील मंडप, सीसीटीव्ही कॅमेरे, स्कायवॉकखालील खड्डे बुजविणे, आरोग्य आणि पाणीपुरवठा यासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या. त्यांनी सांगितले की यंदा भाविकांची संख्या १५ ते २० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने सर्व विभागांनी अधिक सज्ज राहणे आवश्यक आहे.

        पोलीस विभागाने यात्रेदरम्यान १५० अधिकारी, ११०० अंमलदार तसेच ६०० अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची माहिती दिली. दर्शनबारी परिसरात वॉच टॉवर, पीए सिस्टीम आणि मंडप उभारणीचे नियोजन करण्यात आले आहे.

       ग्रामीण रुग्णालय, आळंदी तर्फे २४ तास वैद्यकीय सेवा, ५ आयसीयू बेड, १० वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका सेवा (१०८ व १०२), तसेच साथरोग नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे.

         महावितरण विभागाने अखंडित वीजपुरवठ्याचे आणि जुन्या तारांची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील सर्व खड्डे बुजविण्याचे, तर पाटबंधारे विभागाने नदीत १५० क्युससेस क्षमतेने पाणी सोडण्याचे कळविले.

         आळंदी नगरपरिषदेच्या वतीने दर्शनबारी, सीसीटीव्ही, वॉच टॉवर, मंडप, तसेच अतिक्रमण निर्मूलन ही सर्व कामे १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे सांगण्यात आले. भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेमार्फत १८०० आणि नगरपरिषदेमार्फत १००० मोबाईल टॉयलेट्स बसविण्यात येणार आहेत. शहरात सुरळीत पाणीपुरवठा, पाच फिलिंग पॉइंट्स, NDRF च्या दोन टीम्स, अग्निशमन वाहने, भोजन व्यवस्था आणि अतिरिक्त रोषणाईचीही व्यवस्था केली जाणार आहे.‌ रथोत्सव काळात प्रदक्षिणा मार्गावर जनरेटरद्वारे वीजपुरवठा ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

         मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी पुढील बैठक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार असल्याची माहिती दिली. मा. उपविभागीय अधिकारी, खेड यांच्या संमतीने बैठक यशस्वीपणे संपन्न झाली.