युवराज डोंगरे/खल्लार
केवळ कबूतर व शेळ्या चोरल्याच्या संशयावरून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत हरेगाव येथे चार बौद्ध युवकांना
अर्धनग्न करून व झाडाला उलटे टांगून अमानुषपणे बेदम मारहाण केली.
मारहाण करणारे जातीयवादी गावगुंड एवढ्यावरच थांबले नाही तर थुंकी चाटायला लावून त्यांच्या तोंडावर लघुशंका करून अत्यंत घृणास्पद असा प्रकार केला.
अशा घृणास्पद करण्यात आलेल्या अत्याचाराचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीने तीव्र निषेध करून आरोपींना पाच वर्षासाठी गावबंदीसह जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना अमरावती जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
माणुसकीला काळीमा फासणारी सदर घटना दिनांक 26 ऑगस्ट रोजी उघडकिस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर समाज बांधवांमध्ये प्रचंड अशी चीड निर्माण होऊन सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने दिनांक 30 ऑगस्ट बुधवार रोजी या घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.विवेक घोडके यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना सादर केल्या गेलेल्या निवेदनात चरणदास इंगोले यांनी नमूद केले आहे की, राज्यात दलित- बौद्ध -मागासवर्गीयांवर अत्याचारांच्या वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून त्याद्वारे पुरोगामी महाराष्ट्रात जातीय दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.
याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे माणुसकीला कलंकित करणारी नगर जिल्ह्यातील हरेगाव येथे घडलेली घटना म्हणावी लागेल? दलित मागासवर्गीय बौद्धांवरील होत असलेल्या अत्याचाराची सरकार द्वारा योग्य ती गांभीर्याने दखल घेतल्या जात नसल्याने आणि म्हणावी तशी ॲट्रॉसिटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्या जात नसल्यामुळे जातीय विकृत मानसिकतेने ग्रासलेल्या गावगुंडांच्या अत्याचारी प्रवृत्तीला पाहिजे तशी जरब बसत नाही परिणामी त्यामुळे अशा मस्तवाल गावगुंडांचे मनोबल वाढून वारंवार अत्याचाराच्या घटना घडत असल्याचा आरोपही चरणदास इंगोले यांनी निवेदना द्वारे केला आहे.
तेव्हा वाढत्या अत्याचाराचे प्रमाण रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे केवळ अत्याचाराच्या चौकशीची औपचारिकता पूर्ण करून आरोपींवर थातुर् मातुर कारवाई करून मोकळे होऊन चालणार नाही तर त्यासाठी जातीयवादी अत्याचारी आरोपींना धडा शिकवण्यासाठी कठोर निर्णय घेऊन हरेगाव येथील घडलेल्या या घटनेतील आरोपींना पुढील 5 वर्ष गावात राहण्यास मज्जाव करून त्यांना जिल्ह्याबाहेर तडीपार केल्या जावे अशी प्रमुख मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने करण्यात आली असून अशाप्रकारे जातीय दहशत निर्माण करू पाहणारे अत्याचार रोखण्यास शासनाची उदासीनता आणि पोलीस प्रशासनाची निष्क्रियता जर का कारणीभूत ठरत असेल तर यापुढे पीपल्स रिपब्लिकन पक्षाला कायदा हातात घेऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीला आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा चरणदास इंगोले यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना दिला आहे.
चरणदास इंगोले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाद्वारे निवेदन देताना शहराध्यक्ष एडवोकेट दीपक आकोडे,शहर कार्याध्यक्ष वासुदेव सामटकर,जिल्हा उपाध्यक्ष जानराव वाटाणे,जिल्हा महासचिव गंगाधर खडसे,जिल्हा युवा कार्याध्यक्ष सुनील इंगोले, चंद्रभान मोहोड,सुरेश बहादुरे, प्रदीप ढेंबरे,बाळासाहेब इंगोले, चंद्रकांत रंगारी,बाबूलाल राऊत यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.