Home Maharashtra संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात भव्य स्वागत… — धर्मपुरी येथे...

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात भव्य स्वागत… — धर्मपुरी येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांचे दर्शन…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

सोलापूर – आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे उत्साहात आणि भक्तिभावात स्वागत करण्यात आले.

       आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होताच, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला. धर्मपुरी येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते माऊलींच्या पवित्र पादुकांचे मनोभावे दर्शन घेऊन स्वागत करण्यात आले.

     या वेळी खासदार धैर्यशील मोहिते, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, माजी आमदार राम सातपुते, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले आदी मान्यवर आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

      वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले असून, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्था यांची काळजी घेण्यात येत आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आता भक्तांच्या जल्लोषात पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून, आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी दाखल होणार आहे.