आळंदीत पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा.. — 10,000 मुर्त्या, 7 टन निर्माल्य संकलन!..

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक 

पुणे विभागीय 

आळंदी : “माझी वसुंधरा अभियान 4.0” अंतर्गत समस्त आळंदी पंचक्रोशीत यंदाचा गणेश उत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी गणेश मुर्त्यांचे विसर्जन नदी पत्रात न करता नगरपरिषदेच्या मूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती दान करावे या नगरपरिषदेच्या आवाहनास आळंदीकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व यामुळे साधारणपणे 10,000 गणेश मुर्त्या व 7 टन निर्माल्याचे संकलन झाल्याची माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

          गणेशोत्सव कालावधीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, विषारी रंग, प्लास्टिक आणि थर्मोकोलची सजावट इत्यादी गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो जे पाण्यात न विरघळणारे व विषारी पदार्थ आहेत. या मुर्त्यांचे नद्या, तलाव, विहिरी यांमध्ये विसर्जन केल्यानंतर त्यांचे अवशेष पाण्यात न विरघळता तसेच राहतात परिणामी जलप्रदूषण होऊन पाण्यातील अनेक जीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. त्यामुळे आळंदी नगरपरिषद मागील काही वर्षांपासून “मूर्ती दान व पुनर्वापर” ही संकल्पना अत्यंत प्रभावी पणे राबवित असून यावर्षी देखील या उपक्रमास समस्त आळंदीकरांचा मोठा पाठिंबा मिळाला. आळंदी नगरपरिषदे मार्फत तयार केलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर मोठ्या उत्साहात विधिवत आरती करून गणेश मुर्त्यां व्यवस्थित रित्या जमा केल्या जात असल्याचे चित्र संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत पहावयास मिळाले.

           संकलित श्री गणेश मुर्त्या पुनर्वापरासाठी सेवा भावी संस्थांना दिल्या जातात. या संस्थान मार्फत सर्व गणेश मुर्त्याचे पावित्र्य जपत त्यांचा पुनर्वापर केला जातो त्यामुळे जलस्त्रोतांचे प्रदूषण रोखले जावून पर्यावरण संवर्धनास हातभार लागतो. तसेच संकलित निर्माल्यावर पुढील काही काळ प्रक्रिया करून नगरपरिषद मार्फत खत निर्मिती केली जाणार आहे. आळंदी नगरपरिषद मार्फत मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी सचिन गायकवाड यांच्यासह साधारण 150 अधिकारी, कर्मचारी यांनी संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत उत्तम कामगिरी करत यंदाचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात, निर्विघ्नपणे पार पाडण्यात यशस्वी भूमिका बजावली.