भाविकदास करमनकर
तालुका प्रतिनिधी धानोरा
भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षांचा कालावधी उलटून गेला, तरीसुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील डोंगराळ व अतिदुर्गम गावं आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पक्के रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षण आणि वीजपुरवठा या सुविधांचा अभाव असल्याने विकासकामे रखडली असून ग्रामस्थांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम झाला आहे.
पयडी-आलकन्हार-कनेली व सावंगा-मंगेवाडा या मार्गावर असलेल्या मोठ्या नदीवर आजवर पुलाचे बांधकाम झालेले नाही. परिणामी पावसाळ्यात गावकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. शालेय मुले, रुग्ण, शेतकरी आणि प्रवासी नागरिक नदी ओलांडताना जीव धोक्यात घालतात. काही वेळा मोटारसायकली खांद्यावर घेऊन नदी पार करण्याची वेळ नागरिकांवर येते.
अशा परिस्थितीत एस.टी. बससेवा सुरु होणे अशक्यच ठरत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई तर पावसाळ्यात दळणवळण पूर्णपणे ठप्प – अशा दुहेरी समस्यांचा सामना ग्रामस्थ करतात. बँक व्यवहार आणि शासकीय कार्यालयांशी संपर्क तुटल्याने जनजीवन ठप्प होते.
शेतकऱ्यांना बांधावर जाता येत नाही, विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत होत आहे तर रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत.
पयडी, आलकन्हार, मोरचुल आणि कनेली गावातील ग्रामस्थांनी पुलाच्या बांधकामाबाबत शासनाकडे निवेदन सादर केले. आमदारांनी ‘निधी मंजूर होताच काम सुरु होईल’ असे आश्वासन दिले होते; परंतु वर्ष उलटून गेले तरी काम सुरु झालेले नाही.
आजही पेंढरी-गट्टा परिसरातील अनेक गावं पक्क्या रस्त्यांपासून, आरोग्य केंद्रांपासून आणि शैक्षणिक सोयींपासून वंचित आहेत. आदिवासी जनता आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून मागेच असून शासन व लोकप्रतिनिधींनी या भागाकडे नेमके केव्हा लक्ष देणार, असा जळजळीत सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.



