Home देशविदेश सत्तेचा धर्म आणि धर्माची सत्ता…

सत्तेचा धर्म आणि धर्माची सत्ता…

    धर्म म्हणजे देवाची आराधना, धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे नैतिकता, अशी व्याख्या केल्या गेली आहे, त्यामुळे धर्म कर्तव्य नैतिकता या तिन्ही शब्दाचा एकच अर्थ काढला जातो. 

        देवाशी संबंधित धर्म म्हणजेच देवाची आराधना आणि देवा संबंधीचे कर्मकांड. आणि धर्म हा शब्द जेव्हा माणसा करिता वापरल्या जातो तेव्हा कर्तव्य आणि नैतिकता याचा संबंध असतो. 

       सत्तेचा धर्म कोणता तर देशाचे संरक्षण करणे आणि राष्ट्राचे हेच जोपासणे, म्हणजेच देशातील माणसांचे संरक्षण आणि त्यांचे हित जोपासणे हे सत्तेचा धर्म असतो. देशांतर्गत शांतता आणि सुव्यवस्था राखणे हा सुद्धा सत्तेचा धर्म असतो. 

        देवा संबंधित असलेला धर्म म्हणजे संप्रदाय आणि पंथ यांना पण धर्म समजण्याची प्रथा आहे. 

         सत्तेची सत्ता ही भौगोलिक सीमा असलेल्या प्रदेशावर आणि त्या देशातील समाजावर असते. म्हणून सत्तेचा धर्म म्हणजे कर्तव्य या अर्थाने देशाचे आणि देशातील समाजाचे संरक्षण करणे त्यांचे हित जोपासणे आणि समृद्धी करणे हे होय. एखाद्या देशात अनेक धर्माचे सांप्रदायाचे पंथांचे लोक असतील तर ते सर्व लोक त्या देशाचे नागरिक असल्यामुळे त्या सर्वांचेच संरक्षण करणे आणि हित जोपासणे हे सत्तेचा धर्म म्हणजे कर्तव्यच ठरते. 

       धर्म हा शब्द देवाशी जोडल्यामुळे त्याचा सांप्रदाय बनला. सत्ताही कोणत्याही संप्रदायाची पंथाची म्हणजेच धर्माची नसते. तर ती सर्वच संप्रदायांच्या माणसांची असते. म्हणून सत्तेला धर्म नसतो किंवा धर्माची सत्ता नसते. आणि धर्माची सत्ता जेव्हा असते तेव्हा ती राष्ट्राची किंवा देशाची सत्ता न होता एका विशिष्ट धर्मांच्या लोकांचीच असते. म्हणून ती राष्ट्रवादी नसते तर ती धार्मिक असते. म्हणजेच एका धर्माची आणि एका धर्मासाठीच असते. अशावेळी ती सत्ता इतर धर्मियांवर जुलूम करणारी ठरते. याचा अर्थ इतर धर्मियांना स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय ही मूल्य देऊ इच्छित नाही, म्हणजेच अशी सत्ता ही लोकशाहीवादी नसून हुकुमशाहीवादीच असते. 

          सत्तेची सत्ता ही देशावर आणि देशातील समाजावर असते तर धर्माची सत्ता ही केवळ व्यक्तीवरच असते. कारण धर्म हा व्यक्तीसाठी असतो. धर्माची सत्ता ही व्यक्तीच्या मनावर आणि व्यक्तीवर असते. एक धर्म हा इतर धर्मावर सत्ता गाजवू शकत नाही. कारण धर्म हा स्वतंत्र आहे म्हणून प्रत्येकाला धर्माचे स्वातंत्र्य आहे. म्हणूनच भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी धर्माचे स्वातंत्र्य दिले आहे. कोणता धर्म स्वीकारावा किंवा कोणता धर्म नाकारवा ? किंवा आस्तिक असावे की नास्तिक असावे? याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. याचे कारण म्हणजे माणसाला बुद्धी असते तो सारासार विचार करू शकतो आणि निर्णय घेऊ शकतो, म्हणून हे स्वातंत्र्य संविधानाने दिलेले आहे. 

           सत्तेला धर्म नसतो परंतु सत्तेचा धर्म म्हणजेच कर्तव्य म्हणजेच नैतिकता ही राष्ट्राचे आणि जनतेचे संरक्षण आणि हित जोपासणे हाच असतो. 

    धर्माची सत्ता म्हणजेच व्यक्तीचे कर्तव्य आणि नैतिकता जोपासणे हे धर्माचे कर्तव्य ठरते. सत्ता आणि धर्म हे एकत्र असता कामा नये, कारण कसे झाले तर देशाच्या अखंड तेवर आणि सामाजिक ऐक्यावर संकट येईल. देशाची अखंडता आणि सामाजिक ऐक्य हे दुभंगले जाईल. म्हणून देशावर आणि देशातील आम जनतेवर एकाच धर्माची सत्ता असेल तर त्याचे विपरीत परिणाम होतील. 

      लेखक : दत्ता तुमवाड.

        सत्यशोधक समाज नांदेड. 

              फोन : 9420912209.