प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव गटग्रामपंचायत येथे आज ग्रामसभा ठेवण्यात आली होती.या ग्रामसभेचा कोरम नियमाप्रमाणे पुर्ण झालाय!
परंतु वित्त वितरण हिशोब,वित्त खर्च मंजूर आणि पुढील वर्षाच्या वित्त खर्चाला मंजुरी देणाऱ्या महत्त्वपुर्ण वार्षीक ग्रामसभेला सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांनी दांडी मारली.
यामुळे मौजा हेटी (दाबका) येथील ग्रामस्थांचा रोष अनावर झाला आणि ग्रामसेवक घनश्याम उके यांच्यासह ग्रामपंचायत शिपाई अजीत रामटेके यांना मौजा कोटगाव येथील गटग्रामपंचायत कार्यालयामध्ये कुलुपबंद केले.
मौजा कोटगाव व मौजा हेटी (दाबका) येथील नागरिकांना पिण्याचे मुबलक तथा स्वच्छ पाणी मिळत नाही.याचबरोबर नाल्यां सफाईचा प्रश्न ऐरणीवर आहे.
तद्वतच गटग्रामपंचायत कोटगावला १५ वित्त आयोगाच्या अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचे योग्य नियोजन न करता रुपयांची उचल केल्याचा आरोप मौजा कोटगाव व मौजा हेटी (दाबका) येथील नागरिकांचा आहे.
याचबरोबर सामान्य फंडाचा निधी शिल्लक नसल्याने ग्रामसेवक घनश्याम उके यांच्यापुढे आव्हानात्मक समस्यां आवासून उभ्या ठाकल्या आहेत.
चिमूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नितीन फुलझेले,ग्राम विस्तार अधिकारी,ठाणेदार मंगेश भोंगाडे,बिट जमादार अजय बगडे आणि इतर पोलिस कर्मचारी हे गटग्रामपंचायत कोटगाव कार्यालय स्थळी दाखल झाले आणि ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करुन यथायोग्य परिस्थिती उत्तमपणे हाताळली व ग्रामसेवक घनश्याम उके यांना कुलूपबंद ग्रामपंचायत बाहेर काढले..
गटविकास अधिकारी नितीन फुलझेले यांनी ०६ जून २०२६ ला ग्रामसभा घेण्याचे व सर्व ग्रामस्थांना सुरळीत हिशोब देण्याच्या तोंडी सुचना सरपंच सौ.मुक्ताताई गिरीधर कापसे व ग्रामसेवक घनश्याम उके यांना दिल्यात.
येणाऱ्या ०६ जून २०२६ ला ग्रामसभा अंतर्गत ग्रामसेवक घनश्याम उके आणि सरपंच सौ.मुक्ताताई गिरीधर कापसे हे दोन्ही जबाबदार प्रमुख ग्रामसभेला सामोरे जाताना परिस्थिती कसे हाताळतात यावर गावातील शांतता आणि सुव्यवस्था अवलंबून राहणार आहे.
भिसी पोलिस स्टेशन चे ठाणेदार मंगेश भोंगाडे हे मौजा कोटगाव गटग्रामपंचायत कार्यालय येथे आपल्या ताफ्यासह दाखल झाले आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
यामुळे ग्रामस्थ उद्रेकाची परिस्थिती आटोक्यात आली.तत्पुर्वी अनेक ग्रामसभा तहकूब झाल्याने आणि त्यांच्या मुलभूत व इतर समस्या ग्रामपंचायत स्तरावरुन निकाली काढण्यात येत नसल्याने सहाजिकच आहे,ग्रामस्थ संतप्त होणार!..



