राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
गडचिरोली :- महाराष्ट्र शासनाच्या वाळू/रेती निर्गती धोरण-२०२५ अंतर्गत स्थानिक नागरिकांना स्वस्त आणि पारदर्शक पद्धतीने वाळू उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विशेषतः कुरखेडा तालुक्यात हे धोरण प्रभावीपणे राबवले जात असून,तहसीलदार राहुल पाटील यांनी स्थानिकांना थेट आवाहन केले की प्रती ब्रास वाळू सहाशे रुपयात उपलब्ध करून देण्यात आली आहे,सदर महाराष्ट्र शासनाच्या वाळू/रेती निर्गती धोरणाचा लाभ घ्यावा.
वाकडी,मोहगाव आणि मालेवाडा हे दोन रेती घाट पूर्णपणे स्थानिक नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
या घाटांमधून राखीव आणि लिलावात न गेलेल्या वाळू/रेती स्थानिक घरबांधणी,दुरुस्ती आणि वैयक्तिक वापरासाठी उपलब्ध आहे.
प्रति ब्रास केवळ ६०० रुपये रॉयल्टी भरून रेती उचलता येणार आहे – हे दर पूर्वीच्या अवैध बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत परवडणारे आहेत.
ऑनलाइन प्रक्रिया सोपी,झटपट आणि पारदर्शक
महाराष्ट्र शासनाच्या महाखनिज पोर्टलवर …(https://mahakhanij.maharashtra.gov.in/) वरून ही संपूर्ण प्रक्रिया घरबसल्या पूर्ण होते.
१) आधार ने OTP द्वारे लॉगिन करावे.
२) Common People Application मध्ये अर्ज भरावे.
३) आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (आधार कार्ड, ग्रामसेवक दाखला, स्वयंघोषणापत्र).
४) कमाल ५ ब्रास पर्यंत मागणी करता येईल.
५) तहसीलदारांकडून १५ दिवसांत मान्यता मिळणार.
६) मान्यतेनंतर पेमेंट लिंक मोबाईलवर → १५ दिवसांत ऑनलाइन भरणा करणे आवश्यक..
७) पेमेंट झाल्यावर eTP (इलेक्ट्रॉनिक ट्रान्सपोर्ट परमिट) तयार करा आणि प्रिंट घ्यावे.
७) वाहतुकीदरम्यान eTP,सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असल्याने मध्यस्थ आणि अवैध वाळू माफियांचा मार्ग रोखला गेला आहे.
चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाईल आणि बेकायदेशीर वाहतूक/साठवणुकीस कठोर कारवाई होईल असेही तहसीलदार यांचे म्हणणे आहे..
पर्यावरण संरक्षणासह विकासाची हमी
हे धोरण नद्यांच्या अवैध उत्खननावर आळा बसवते,कृत्रिम वाळू (M-Sand) ला प्रोत्साहन देते आणि प्रधानमंत्री आवास योजने सारख्या घरकुल योजनांसाठी १०% वाळू राखीव ठेवते.कुरखेड्यातील हजारो कुटुंबांना आता घरबांधणीचे स्वप्न पूर्ण करता येईल.
तहसीलदार राहुल पाटील म्हणाले, “स्थानिक नागरिकांनी त्वरित महाखनिज पोर्टलवर अर्ज करावा.ही संधी नागरिकांनी गमावू नये.तुमच्या घरासाठी, तुमच्या विकासासाठी!…



