ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : रविवार म्हणजे साकोलीत आठवडी बाजाराचा दिवस. तालुक्यासह तालुक्याच्या बाहेरून आपला भाजीपाला घेऊन व्यवसाय करण्यासाठी अनेक व्यवसायिक येतात. व्यावसायिकांमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता जनजागृती व्हावी म्हणून आज रविवारी नगरपरिषदेच्या प्रशासनासह साकोली मीडिया, व्हीआयपी ग्रुप व फ्रिडमच्या सहकार्याने स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मागील आठवड्यात अशाच एका महाशयाने आपले चारचाकी मेट्याडोअर सौंदर्यस्थळी लावून शासकीय रस्ता म्हणजे बापजाद्याची प्रॉपर्टी समजून चक्क खुलेआम भाजीपाल्याचा कचरा फेकून दिला. एका सतर्क मीडियाच्या प्रतिनिधीने हे छायाचित्र आपल्या भ्रमणध्वनीमध्ये टिपले आणि नगरपरिषद प्रशासनाला पाठविले.
त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनीसुद्धा याची दखल घेऊन या विषयाला समोर आणले. बाहेरून येऊन येथे व्यवसाय करायचा आणि गावाला जाण्यापूर्वी साकोलीत भाजीपाला रूपातील उर्वरित सडका माल फेकून आपल्या गावाला पोबारा करायचा हा तमाशा रोज आठवडी बाजाराच्या दिवशी दिसून येतो. साकोली नगरपरिषद प्रशासनाने या संदर्भात कडक पाऊले उचललेली आहेत.
व्यावसायिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. याकरिता प्राथमिक स्तरावर व्यावसायिकांना माहिती व्हावी याकरिता साकोली मीडिया, व्हीआयपी ग्रुप व फ्रिडम युथ फाऊंडेशन सहकार्याने स्वच्छता जन जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या करिता अनिल कापगते, आशिष चेडगे, किशोर बावणे, ऋग्वेद येवले, रवि भोंगाने सामाजिक कार्यकर्ता महेश पोगडे यांचे महत्त्वाचे सहकार्य असेल.



