Home देशविदेश मानवता आणि धर्म…

मानवता आणि धर्म…

        मानवता हा शब्द फक्त माणसासाठी वापरला जातो पशुपक्षी प्राणी याच्यासाठी मानवता हा शब्द वापरल्या जात नाही, याचा अर्थ ज्याला बुद्धी आहे आणि त्या बुद्धीला वाव आहे किंवा ती बुद्धी विचार करू शकते किंवा ज्या बुद्धीला विचाराची मर्यादा नाही असा प्राणी म्हणजे माणूस होय, बुद्धीच्या या वैशिष्ट्यामुळेच माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा प्राणी आहे, त्यास मानव किंवा माणूस असे म्हणतात. मानवता हे एक माणसाला लावलेले विशेषण आहे.

           माणसाचे वैशिष्ट्य आहे. म्हणजेच माणसाचे वेगवेगळे पण आहे. परंतु माणूस आपली मानवता हे आपले वेगळेपण किंवा गुणविशेष जेव्हा विसरतो, तेव्हा अनेक वैयक्तिक किंवा सामाजिक समस्या निर्माण होतात. खरे तर मानवता हा माणसाचा गुणविशेष हाच त्याचा धर्म होय, म्हणजेच माणसाचा धर्म हा मानवता धर्म होय. कर्तव्य म्हणजेच धर्म होय.

        माणसाच्या बुद्धीचा धर्म आणि मनाचा धर्म म्हणजे काय, तर अशी की, बुद्धीचा धर्म हा मनाला आवर घालण्याचे कर्तव्य होय, आणि मनाचा धर्म म्हणजे बुद्धीचे ऐकणे हे होय. मनाला आवर घालण्यासाठी बुद्धी ही मनातील चांगले आणि वाईट काय, याची फरक करीत असते, चांगले आणि वाईट हे बाजूला काढण्याचे काम बुद्धी करते, हे चांगले आणि हे वाईट हे ते सांगून टाकते, पण त्यापैकी काय स्वीकारायचे, हे विवेक बुद्धी म्हणजेच प्रज्ञा बुद्धी ठरवीत असते, याचा अर्थ विवेक म्हणजे प्रज्ञा बुद्धी हे न्यायाधीशाचे काम करते, निकाल किंवा निष्कर्ष काढण्याचे काम करते. 

         प्रत्येक स्त्री-पुरुषाकडे मन बुद्धी आणि विवेक हा निसर्ग दत्त असतोच, पण याकडे कुणाचे लक्ष नसते, म्हणून धर्म या संकल्पनेबद्दल अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत, यातूनच अनेक पारंपारिक धर्म निर्माण झालेले आहेत, खरे तर माणसाचा मूळ धर्म किंवा नैसर्गिक धर्म म्हणजेच मानवता धर्म होय, मानवता धर्म हाच सर्व धर्माचा पाया आहे, मानवता धर्म हा सर्व धर्म संस्थांची मातृसंस्था आहे, कारण मानवता धर्म म्हणजेच सत्य न्याय नीती, आणि दया क्षमा शांती, स्वातंत्र्य समता बंधुता न्याय, परस्पर सहकार्य, सलोखा, सहजीवन, प्रेम ही सर्व मूल्य म्हणजेच मानवता धर्म होय.

         मानवता धर्म हा नैसर्गिक धर्म आहे तर बाकीचे अनेक धर्म हे मानवनिर्मित म्हणजेच कृत्रिम धर्म आहेत, ज्यात अनेक अनिष्ट रूढी आणि परंपरा आहेत, प्रत्येक धर्माचा पाया हा मानवता धर्म जरी असला, आणि मानवता धर्माची मूल्य ही माणसाला जिवंत राहण्यासाठी अत्यंत उपयोगाची असले तरी, आणि हीच मूल्य जपण्यासाठी अनेक कृत्रिम म्हणजे पारंपरिक धर्म निर्माण झाले असले तरी, ती मूल्य जपल्या जात नाहीत, याची कारणे म्हणजे अंधश्रद्धा कर्मकांड अनिष्ट रूढी आणि परंपरा हे आहेत. ज्यात सत्य न्यायनीती बंधुभाव प्रेम या मूल्यांचे आकुंचन होते. ही मुले विसरल्या जातात. आणि अंधश्रद्धा कर्मकांड रोटी याचाच वापर जास्तीत जास्त केल्या जातो, म्हणून आज जगात धर्म ही एक मोठी समस्या होऊन बसलेले आहे, धर्म हे एक मानव जातीसाठी मोठे संकट होऊन बसलेले आहे, धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण झाले असल्यामुळे, वर्चस्वाची भावना निर्माण झाले झाली असल्यामुळे, आपलाच धर्म श्रेष्ठ आणि इतर धर्म कनिष्ठ, आपलाच धर्म योग्य आणि इतर धर्म अयोग्य आहेत म्हणून आपलाच धर्म साऱ्या देशात साऱ्या जगात असला पाहिजे आणि बाकीचे धर्म नष्ट झाले पाहिजे त, या हट्टा पायी, चुकीच्या विचारापायी धर्मयुद्धे होत आहेत, आणि यात मनुष्यसंहार होत आहे, या धर्मयुद्धात मानव जातच नष्ट होईल की काय, अशी चिंता विचारवंता पुढे निर्माण झालेली आहे.

         म्हणून धर्म ही अफूची गोळी आहे, तिचे सेवन केले की माणूस तिच्या धुंदीत नशेत कसे माणसे मारीत सुटतो, याचे भान त्याला नसते, असे कार्ल मार्क्सने म्हटले आहे, हे या काळात सत्याच्या कसोटीवर उतरलेले आहे. धर्म ही संकल्पना माणसाच्या प्रगतीसाठी आणि माणसाला जिवंत ठेवण्यासाठी निर्माण झालेली आहे, हा मुख्य उद्देश धर्माचा असेल तर, सर्व धर्मांनी एकमेकांचा द्वेष न करता एकमेकांच्या चुका काढीत न बसता, एकमेकांवर टीका करण्याऐवजी, आपल्या धर्माचा माणुसकीसाठी आणि मानवतेसाठी कसा उपयोग होऊ शकतो हे प्रत्येक माणसाला हातात तलवार न घेता पटवून देणे महत्त्वाचे आहे, जबरदस्तीने धर्म स्वीकारल्यामुळे माणूस धर्म पाळतो असे नाही, तर धर्माबद्दलची त्याची संमती खात्री महत्त्वाची आहे, म्हणून मानवनिर्मित जे जे काही पारंपारिक धर्म या जगाच्या पाठीवर निर्माण झालेल्या आहेत, त्यांनी इतर धर्माचा देश न करता, किंवा इतर धर्माचे अस्तित्व मिळण्याच्या भानगडीत न पडता, सर्वधर्मसमभावाची किंवा धर्मनिरपेक्षतेची भावना किंवा विचार स्वीकारून, आपल्या धर्माचे तत्व विचार आणि आचरण इतर धर्मियांना मनातून स्वीकारायला लावणे, हाच विधायक प्रयत्न केला तर, कोणता धर्म की किंवा नष्ट होईल, हे काळच ठरवेल, माणसाने ठरविण्याची गरज नाही, आणि यासाठी बळजबरीचा शक्तीचा वापर करणे सोडून दिले पाहिजे. 

         मुळात मानवधर्म हाच सर्व धर्माचा पाया असल्यामुळे, मानव धर्माची प्रतिष्ठा आणि मानवधर्माबद्दलची आस्था प्रत्येकाने प्रत्येक धर्माच्या व्यक्तीने उराशी बाळगून, या धर्माचा सन्मान करून च आपला धर्म टिकविणे महत्त्वाचे आहे, 

         तसेच प्रत्येकाने आपापल्या धर्मातील रूढी परंपरा चालीरीती कर्मकांड आचरण यातील सत्यता पडताळून पाहणे हेही अत्यंत महत्त्वाचे आहे, जे सत्याच्या कसोटीवर उतरत नाही, ते अशुद्ध आणि अपवित्र समजून त्याचा त्याग केला पाहिजे, गढूळ झालेल्या धर्मात सत्य या तुरटीचा वापर करून सर्वधर्म शुद्ध करणे ही काळाची गरज आहे, याबरोबरच मानवधर्म हाच खरा धर्म समजून त्याच धर्माचे पालन करणे आणि आपला धर्म सोडणे किंवा आपल्या धर्माचा त्याग करणे, सर्व धर्माच्या लोकांनी आपापल्या धर्माचा त्याग करून फक्त मानवधर्माच्या मूल्यांचा नीतीनेमांचा वापर करून आचरण केल्यास सर्व धर्माची गरज पण पडणार नाही, ही पण मानसिकता दृढ होण्याची गरज आहे. आपण सारे जण आधी माणूस आहोत, आणि नंतर धर्म आणि जात आहे, जी आपल्यामध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहे,ती जात आणि धर्म त्याग करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.ही काळाची गरज आपण ओळखली नाही तर, आपला मृत्यू अटळ आहे, त्याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. 

              लेखक

             दत्ता तुमवाड

           सत्यशोधक समाज नांदेड

  दिनांक : 28 एप्रिल 2026 फोन : 9420912209