Home Maharashtra धानोरा तालुका कृषी सेवा केंद्र चालक पाळणार बेमुदत संप… — तहसीलदार...

धानोरा तालुका कृषी सेवा केंद्र चालक पाळणार बेमुदत संप… — तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना दिले निवेदन….

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

धानोरा : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि वारंवार मिळणाऱ्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी, जिल्हातील कृषी व्यावसायिकांनी आता एल्गार पुकारला आहे. ‘आश्वासन नको, न्याय हवा’, अशी भूमिका घेत धानोरा तालुका अॅग्रो डीलर्स असोसिएशनसह जिल्हातील सर्व कृषी व्यावसायिक २७ एप्रिलपासून बेमुदत संपावर जात आहेत. मागण्या लेखी स्वरूपात मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.

          असोसिएशनने स्पष्ट केले आहे की, आतापर्यंत अनेक आंदोलने केली. मात्र, केवळ आश्वासने मिळाली. बियाणे विक्री, खतांची लिंकिंग, सॅम्पलिंगचे टार्गेट या सर्व प्रक्रियेत किरकोळ विक्रेत्यालाच नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. या अन्यायाविरुद्ध आम्ही आता संपूर्ण तालुकासह महाराष्ट्रात बेमुदत संप पुकारत आहोत. कृषी व्यावसायिकांच्या या निर्णयामुळे ऐन खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत अडथळे येऊ शकतात.

बियाणे कंपन्यांना जबाबदार धरावे, लिंकिंग बंद करावी.

         बियाणे कंपन्यांच्या मालाची तपासणी करून कृषी विभागाने परवानगी दिली असताना, सॅम्पल फेल झाल्यास होणारी कोर्ट केस आणि नाहक त्रास दुकानदारांना न होता, पूर्ण जबाबदारी बियाणे उत्पादक कंपनीची असावी.

         बियाणे कंपन्यांकडून पक्क्या २ बिलात आणि लॉट नंबरसह खरेदी केलेला माल असताना, पुन्हा साथी अॅपसारख्या क्लिष्ट प्रणालीची सक्ती तातडीने रद्द करावी. खत कंपन्यांकडून लिंकिंग त्वरित बंद करावी.

         बोगस आणि अवैध बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी, परवानाधारक दुकानदारांनाच किरकोळ त्रुटींवरून त्रास देणे थांबवावे. नवीन परिपत्रकानुसार खत विक्रीचे नियम अत्यंत कठोर आहेत. सातबारा पाहणे किंवा शेतकऱ्यांच्या वादाला तोंड देणे दुकानदारांना शक्य नाही, असे म्हटले आहे. 

          या प्रसंगी धानोरा तालुका अॅग्रो डीलर्स असोसिएशन चे बशीर पिरणी, जयेंद्र गायकवाड, हारिस खान, साईनाथ गुरनुले, सचिन लाकूडवाहे, पुष्पाजी नरोटे, आकाश गावंडे, अजय दास व तालुक्यातील सर्व कृषी केंद्र चालक उपस्थित होते.