Home Maharashtra बीएड अपियर विद्यार्थ्यांची मागणी : TAIT परीक्षेत सहभागी होण्यासाठी संधी द्यावी.. ...

बीएड अपियर विद्यार्थ्यांची मागणी : TAIT परीक्षेत सहभागी होण्यासाठी संधी द्यावी.. — महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला पुणे येथे निवेदन सादर… — वयोमर्यादा आणि संधीचा प्रश्न ऐरणीवर..

ऋषी सहारे

    संपादक

बीएड (अपियर) विद्यार्थ्यांनी आज दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांच्याकडे निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे त्यांनी मागणी केली की बीएड अंतिम सत्रातील (अपियर) विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता व भरती प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या TAIT परीक्षेमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जावी.

       विद्यार्थ्यांनी नमूद केले की, राज्यातील विविध विद्यापीठांमधील बीएड अंतिम वर्षाचे विद्यार्थी सध्या परीक्षा प्रक्रियेत आहेत किंवा काहींच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. मात्र TAIT परीक्षेसाठी वयोमर्यादा लक्षात घेता, अंतिम वर्षाचे (अपियर) विद्यार्थी वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना संधी मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

        या निवेदनात त्यांनी स्पष्ट केले की, अनेक विद्यार्थ्यांचे वय मर्यादेच्या अंतिम टप्प्यावर असून परीक्षा संपल्यानंतर त्यांना संधी न मिळाल्यास त्यांचे शिक्षण आणि कारकीर्द दोन्ही प्रभावित होईल. त्यामुळे, राज्य परीक्षा परिषदेने तातडीने निर्णय घेवून बीएड अपियर विद्यार्थ्यांना TAIT परीक्षेत बसण्याची परवानगी द्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

       सचिन नागरगोजे, कृष्णा धांडे, आणि तुषार तांदुळे या विद्यार्थ्यांनी या निवेदनावर स्वाक्षरी करून आपल्या भावना मांडल्या.