अमान क़ुरैशी
जिल्हा प्रतिनिधि
दखल न्यूज़ भारत
सिंदेवाहि तालुक्यातील आठवडी बाजार व गुजरीमध्ये व्यापाऱ्यांकडून नियमबाह्य वजनकाट्यांचा वापर सुरू असल्याचे वास्तव उघडकीस येत आहे. या अवैध प्रकारामुळे शेतकरी, सामान्य ग्राहक व लहान व्यापाऱ्यांची हानी होत असून, कष्टाचे पैसे देऊनही योग्य प्रमाणात माल न मिळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
अशा गंभीर स्थितीत नगरपंचायत सिंदेवाही यांच्या सहकार्याने तहसील कार्यालयाशी संबंधित “अन्न व नागरी पुरवठा विभाग” तसेच “वजन-काटे पासिंग विभाग” यांनी सक्रिय भूमिका घेणे अपेक्षित होते. परंतु, या महत्त्वाच्या विभागांकडून पुरेसा देखरेखीचा अभाव दिसून येत असल्याने स्थानिक बाजारपेठांमध्ये नियमबाह्य वजनकाटे निर्धोकपणे वापरले जात आहेत, ही बाब चिंताजनक आहे.
याबाबत “सामाजिक कार्यकर्ता तसेच स्थानिक नगरसेवक युनुसभाई शेख” यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून, “नागरिकांचे नुकसान रोखण्यासाठी तातडीने तपासणी करून दोषींवर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी” अशी विनंती केली आहे.
त्यांनी पुढे असेही नमूद केले की, आठवडी बाजार आणि गुजरीतील प्रामाणिक व्यापार व ग्राहकांच्या हक्काचे रक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. संबंधित विभागांनी तत्काळ लक्ष घालून योग्य उपाययोजना कराव्यात, हीच आमची अपेक्षा आहे.”
स्थानिक नागरिकांनीदेखील प्रशासनाने या प्रश्नावर गांभीर्याने कारवाई करून पारदर्शक व न्याय्य व्यवहार होण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी व्यक्त केली आहे.



