दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : श्री ज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी येथे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त प्रहारी गट आणि आळंदी पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या वेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमाजी नरके यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या घातक परिणामांविषयी मार्गदर्शन केले.
शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवर होणारे अमली पदार्थांचे दुष्परिणाम त्यांनी प्रभावी उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर मांडले. तसेच व्यसनाधीनतेमुळे तरुणांचे होणारे नुकसान, अमली पदार्थांची अवैध तस्करी आणि संबंधित कायद्यांविषयी सविस्तर माहिती नरके यांनी दिली.
“शालेय जीवनात अशा प्रकारच्या जनजागृतीची नितांत गरज असून, विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहून इतरांनाही प्रेरणा द्यावी,” असे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले. यावेळी विद्यालयातील “संस्कारक्षम ओळख श्री ज्ञानेश्वरीची” या उपक्रमाचे विशेष उल्लेख करून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमास आळंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी मच्छिंद्र शेंडे, दामिनी पथकातील दिव्यांका घाडगे व पूजा नाईक, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन नारायण पिंगळे, प्रकाश पवार, जगदीश गायकवाड आणि राजू सोनवणे यांनी केले. उपस्थित सर्वांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबविल्याबद्दल समाधान व्यक्त केले.



