माय मराठी अजूनही खेड्यात जागी हाय… — प्रिंट मिडीया व ईलेक्ट्रॉनिक मीडिया चिखलदरा तालुका अध्यक्ष अबोदनगो चव्हाण…

    अबोदनगो चव्हाण 

तालुका प्रतिनिधी चिखलदरा

       दखल न्युज भारत 

चिखलदरा :-

“मराठी राज्यभाषादिन विशेष”.

         ग्राम संस्कृती माय मराठीचा अजूनही खेड्यात जागर घडवून आणत आहे. जरी संगणकाने मराठी माणसावर अधिराज्य केले तरीही महाराष्ट्राच्या दऱ्या खोऱ्यात माय मराठीचा सुगंध दरवळ आहे.

          मराठी लोक संस्कृती महाराष्ट्राच्या खेडयानं जपून ठेवली आहे म्हणून खेड्या खेड्यातून लोकगीतांची धून घुमत आहेत. लहान बाळांच्या बारशातील गाणी पाळणा गीते मराठी मनाचा उत्साह वाढवित आहेत. लग्न समारंभातील लोक गीतेतर मराठी भाषा समृद्ध करणारी आहेत खेडयात विविध जाती धर्मांची माणसं असल्यामुळे विविध धार्मिक उत्सवाला गाणी म्हटली जातात.

          त्यातून दुर्मिळ शब्दांचा खजिनाच उधळला जातो शेतकरी शेतात कष्ट करतांना रानात अनेकविध गाणी गात गात कष्टाचा भार हलका करून मोटेवरची गाणी म्हणत पिकांना पाणी पाजत असतो शेती गीतांचा उत्सव महानगरात कधीच पहायला मिळत नाही अजूनही ग्राम संस्कृती ही गाणी टिकून आहेत.

          स्रीयांची लोकवाणी तर खेड्यात हरत-हेने दिसून येते जात्यावरच्या ओव्या तर मराठी भाषेची सुंदर लेणीच आहेत. माहेरांची गाणी मराठी भाषेची थोर समृद्धी आहे सासरचे दुःख आणि कष्ट खेडूत जीव ओतून मराठी बोलीत ओतत असते मराठी भाषेचा ओलावा महाराष्ट्राच्या ग्राम संस्कृतीत दीर्घ काळ टिकून आहे खरी मराठी भाषा खेडयात रेंगाळलेला दिसून येते.

          पहाटेची ग्रामगीते खेड्यात सुगीच्या वेळची गाणी तसेच लोक संस्कृतीचे उपासक असेलेले वासुदेव ‘डोंबारी ‘ कोल्हाटी पासेपारधी ‘ गोंधळी ‘ बहुरूपी ‘ कडक लक्ष्मी ‘ वाघ्या मरळी , जोगतीनी ‘ यांच्या गीतातून आजही मराठी लोक संस्कृतीचे दर्शन घडत आहे . मराठी भाषा या सर्व घटकांनी भरजरी करून नटविली आहे खरं लोकमानस खेड्यातील माणसांनी घडवून आणले त्यात भर पडली ती लोक कथेची दैवत कथेची पुराण कथेची ‘ आणि मिथकांची या सर्व कथा मौखिक होत्या पिढयानं पिढ्या पुढे पुढे सरकत येवून आज मराठी भाषेचा कळस झाल्या आहेत.

           म्हणी ‘ वाकप्रचार ‘ खेड्यात मोठ्या प्रमाणात बोलल्या जातात म्हणून मराठी भाषा व संस्कृती टिकून आहे भलरी गीते गावून मराठी भाषेची शब्दकळा विकसित होतांना दिसते. मातीची गाणी आजही खेड्यात ताकदिने म्हटली जातात सण समारंभ यातून गायलेली गीते मराठी भाषेचे वैभव टिकवून ठेवत आहेत.   

           लोकवाणी जेव्हा खेड्यांची कुस फोडून बाजूला येईल तेव्हाच मराठी भाषेचे बांध फोडले जातील आज आपण प्रमाण मराठी भाषेचाच विचार करतो शुद्ध भाषेचा आग्रह धरतो आणि लोकमानसांनी जपून ठेवलेली माय मराठीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतो.

          कितीही आधुनिकता आली, कितीही तंत्रज्ञान विकसित झाले तरीही माय मराठी ग्राम संस्कृतीच्या कुशीत आजही सुखा समाधानात नांदत आहे म्हणूनच लोकसाहित्य हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे धन आहे तेच धन माय मराठीच्या रूपांन खेळ्यात रांगत आहे या रांगणाऱ्या माय मराठीच्या बाळाला कडेवर घेऊन नाचणाऱ्या माणसांची आज गरज आहे तरच आजचा मराठी गौरव दिन साजरा केल्याचे सार्थक लागले.