येत्या दोन दिवसांत इंद्रायणी नदी बाबत बैठक बोलावली जाईल : जिल्हाधिकारी देशमुख यांचे इंद्रायणी सेवा फौंडेशनला आश्वासन….

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

       आळंदी : उगम ते संगम पवित्र अशी इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी गेली अनेक वर्षे जनजागृतीच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या इंद्रायणी सेवा फौंडेशनचे पदाधिकारी दि.१ मे महाराष्ट्र दिनी साखळी उपोषणाला बसले होते. पाच दिवस साखळी उपोषण चालले होते, या उपोषणाची दखल घेत उपविभागीय दंडाधिकारी यांनी येत्या दहा दिवसांत इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्व संबंधितांची बैठक लावण्यात येईल असे आश्वासन देऊन साखळी उपोषण सोडण्यात आले होते. परंतु आज पंधरा दिवस झाले तरी प्रशासनानी याची दखल न घेता पाठपुरावा बाबत कसलीही माहिती इंद्रायणी सेवा फौंडेशनला दिली नाही याच अनुषंगाने इंद्रायणी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, शिरीष कारेकर, डॉ सुनील वाघमारे आणि अरुण बडगुजर यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना भेटून इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी निवेदन दिले.

       याबाबत जिल्हाधिकारी देशमुख यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी योग्य ते नियोजन केले जाणार आहे, येत्या दोन दिवसांत इंद्रायणी नदी बाबत बैठक बोलावली जाईल असे आश्वासन यावेळी त्यांनी इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले.