युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारी रक्कम थकीत कर्जाच्या नावाखाली थेट कर्ज खात्यात वर्ग केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांचे आधार कार्ड ज्या बँकेत लिंक आहे, त्या बँकांकडून परस्पर कर्जवसुली केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अमरावती तसेच जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक अमरावती यांच्याशी थेट चर्चा करून निवेदन सादर केले.
कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारी सीसीआयची रक्कम, शेतकरी अनुदान किंवा इतर कोणतेही शासकीय पैसे बँकांनी परस्पर कर्ज खात्यात वर्ग करू नयेत, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. यानंतरही जर कोणत्याही बँकेने अशी वसुली केली, तर संबंधित बँक अधिकाऱ्याला “शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ” असा स्पष्ट इशाराही युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी दिला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांचे पैसे कर्ज खात्यात वर्ग केल्यानंतर ते परत देण्यास बँक टाळाटाळ करत असल्यास, अशा पीडित शेतकऱ्यांनी थेट संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासन व बँकांनी तात्काळ स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.



