आळंदीत सकल मराठा समाजाच्या वतीने उद्यापासून महाद्वार चौकात साखळी उपोषण…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

         आळंदी : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव एकवटले आहेत. दरम्यान, जरांगे- पाटील यांच्या पाठींब्यासाठी सकल मराठा समाज आळंदी व परिसरातील गाव यांच्या वतीने उद्या गुरुवार, दि.२६ ऑक्टोंबर पासून श्री क्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरातील महाद्वार चौकात साखळी उपोषण करण्याचा निर्णय सकल मराठा समाज आळंदी आणि परीसरातील गाव यांच्यावतीने घेण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने आळंदी नगरपरिषद व आळंदी पोलिस स्टेशन यांना याबाबत सकल मराठा समाज आळंदी व परिसरातील गाव यांच्या निवेदन देण्यात आले आहे.

        आळंदी येथील सकल मराठा बांधवांच्या वतीने मराठा समन्वयकांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी मराठा समाजाला ५० टक्केच्या आत ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या महिनाभरा पासून आंदोलन सुरू केले आहे. सरकारला दिलेला ४० दिवसाची वेळ २४ ऑक्टोंबरला संपली असून, शासनाने आरक्षण न दिल्यास आळंदी आणि परीसरातील गाव सकल मराठा समाजाच्या वतीने आळंदीत साखळी उपोषण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

         २६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७ वाजता साखळी उपोषणास सुरुवात होणार असून आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आता नाही तर कधीच नाही या भावनेतून आळंदी आणि परीसरातील गाव या सर्व मराठा समाजाने ही शेवटची लढाई समजून या साखळी उपोषणास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आळंदी आणि परीसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.