Home Maharashtra ब्रह्मपुरीत धरणे आंदोलनात विधेयकाची प्रतिकात्मक होळी… — जनसुरक्षा विधेयक म्हणजे जनतेचा...

ब्रह्मपुरीत धरणे आंदोलनात विधेयकाची प्रतिकात्मक होळी… — जनसुरक्षा विधेयक म्हणजे जनतेचा गळा घोटणारा कायदा!

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

      जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती ब्रह्मपुरीच्या वतीने आज (२५ जुलै) रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

       आंदोलनात पत्रकार,वकील,शिक्षक,योजना कर्मचारी,शेतकरी,युवक यांच्यासह बहुजन समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.जनसुरक्षा विधेयक हा कायदा जनतेच्या सुरक्षेसाठी नसून सत्ताधाऱ्यांच्या हितासाठी असल्याचे आंदोलकांनी स्पष्टपणे सांगितले.

         सदरहुन कायद्यामुळे सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अर्बन नक्षली ठरवण्याचा धोका निर्माण झाला आहे.या संज्ञेची कोणतीही स्पष्ट व्याख्या विधेयकात नसल्याने शिक्षकांनी मागणी केली,वकिलांनी मत मांडले, पत्रकारांनी सत्य लिहिले,शेतकऱ्यांनी व कामगारांनी मोर्चा काढला तर त्यांनाही देशद्रोही ठरवले जाऊ शकते.

       त्यामुळे हा कायदा लोकशाहीला संपवणारा,भीतीदायक आणि जनविरोधी असल्याची तीव्र प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

    धरणे आंदोलनात मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विचारमंथन केले.यावेळी डॉ.प्रेमलाल मेश्राम,विनोद झोडगे,लिलाधर वंजारी,जगदिश पिलारे,संतोष रामटेके,जिवन बागडे,मिलिंद रंगारी,सुधाकर पोपटे,संजय वाळके,डॉ.महेश कोपुलवार,स्वप्निल राऊत,राजेश माटे,प्रभू लोखंडे,डी.एम.रामटेके,डेविड शेंडे,हरिश्चंद्र चोले,आर.बी.मेश्राम,वर्षा घुमे,प्रतिभा डांगे यांची उपस्थिती होती.

विधेयकाची प्रतीकात्मक होळी आज करण्यात आली.

        “असा कसा हटत नाही, हटल्याशिवाय राहत नाही!”, “जनसुरक्षा नव्हे,जनविरोधी कायदा!”, अशा घोषणांनी येथील परिसर दणाणून गेला होता.

      आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत महामहीम राज्यपाल यांना निवेदन सादर करण्यात आले.

      येत्या ८ ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असून,सर्व सामाजिक संघटनांनी यात सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले. 

       हा विधेयक रद्द झाल्याशिवाय शांत बसणार नाही,हा निर्धार या आंदोलनातून एकंदरीत दिसून आला.