Home Social ज्ञानेश्वरीचे तत्वज्ञान समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले पाहिजे :- नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे… ...

ज्ञानेश्वरीचे तत्वज्ञान समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले पाहिजे :- नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे… — ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ उपक्रमांतर्गत आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यशिक्षण आणि संस्कारांची नितांत गरज असताना संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार आणि ज्ञानेश्वरीचे तत्वज्ञान समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले पाहिजे, असे मत आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी व्यक्त केले. ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ उपक्रमांतर्गत आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

         यावेळी आचार्य सागर महाराज देशमुख, आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, श्री ज्ञानेश्वर महाराज चरीत्र समितेचे अध्यक्ष प्रकाश काळे, दिपक पाटील, आळंदी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष सुजाता तापकीर तसेच नगरसेवक व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

         आळंदी ही संत ज्ञानेश्वर महाराजांची भूमी असून येथून ज्ञानेश्वरीचा विचार देशभर पोहोचण्याची ऐतिहासिक जबाबदारी आपल्यावर आहे, असे सांगत नगराध्यक्ष कुऱ्हाडे यांनी यापुढे आळंदी नगरपालिकेच्या शाळांमध्ये ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ हा उपक्रम राबविण्यात येईल, तसेच या कार्यात नगरपालिका सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली. या उपक्रमात अन्य शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

         प्रास्ताविकात अजित वडगांवकर यांनी गेल्या पाच वर्षांत हा उपक्रम एका शाळेपुरता मर्यादित न राहता ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ असा व्यापक परिवार निर्माण झाल्याचे स्पष्ट केले. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरीतील जीवनमूल्ये, विद्यार्थी जीवनातील आचार-विचार, विवेक व मानवता या विषयांवर प्रभावी वक्तृत्व सादर केले.