Home Crime अमरावतीत एका तासात तीन महिलांचे ₹३.७५ लाखाचे सोन्याचे दागिने हिसकावले.. —...

अमरावतीत एका तासात तीन महिलांचे ₹३.७५ लाखाचे सोन्याचे दागिने हिसकावले.. — दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ; तीन स्वतंत्र गुन्हे दाखल… 

अबोदनगो एस.चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

         दखल न्युज भारत

अमरावती :- शहरात दुचाकीस्वार चोरट्यांनी सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचे सत्रच सुरू केले आहे. फक्त एका तासाच्या अवधीत फ्रेजरपुरा, बडनेरा आणि राजापेठ पोलिस ठाण्यांत तीन महिलांचे एकूण ₹३.७५ लाखाचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याच्या तीन स्वतंत्र फिर्यादी नोंदल्या गेल्या. तिन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी दुचाकीचा वापर करून महिलांच्या गळ्यातील दागिने ओढून पळ काढला. चोरट्यांच्या एकाच गँगने चेन लुटीच्या या घटना केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

मोतीनगरमध्ये ४५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावले…

          काल सायं. ५.४५ ते ६.५३ वाजताच्या दरम्यान मोतीनगर गल्ली नं. ६ येथे महिला फिर्यादी ब्युटी पार्लरमधून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी अचानक तिच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाचे, सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. घटनास्थळी गर्दी असूनही चोरटे क्षणार्धात पसार झाले. रात्री १०.३२ वाजता फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यांत कलम ३०९(४) बीएनएस नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बडनेरात दत्तमंदिराजवळ मिनी मंगळसूत्र लंपास…

             काल सायं. ६.३० वाजता महिला फिर्यादी दत्तमंदिराकडे जात असताना दत्तमंदिर कमानजवळ दोन युवक मोटारसायकलवरून आले. वय २० ते २५ वर्षांच्या आसपास दिसणाऱ्या दोघांपैकी मागील युवकाने तिच्या गळ्यातील २ डोरल्यांचे ८ ग्रॅम वजनाचे मिनी मंगळसूत्र (किंमत ३०,००० रुपये) जोरात ओढून हिसकावले. फिर्यादीला मोटारसायकलचा नंबर दिसला नाही. गुन्हा रात्री ८.२६ वाजता नोंदविला गेला.

कृष्णार्पण कॉलनी पुलाजवळ ३ लाखांची सोन्याची चैन हिसकावली…

        जागृती महिला मंडळाच्या मासिक कार्यक्रमानंतर सायं. ६.४० वाजता महिला फिर्यादी काल आपल्या दोन मैत्रिणींना सोबत घेऊन परतत होती. मैत्रिणी नवाथे चौकात उतरल्यावर फिर्यादी पुढे कृष्णार्पण कॉलनी पुलाजवळ पोहोचताच दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी तिच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (किंमत सुमारे ३ लाख रुपये) जबरीने हिसकावून घेतली.

          घटनेची नोंद रात्री ११.४३ वाजता राजापेठ पोलिस ठाण्यात कलम ३०४(२), ३(५) भान्यास नुसार करण्यात आली.

            महिलांच्या दागिने हिसकावण्याच्या सलग घटनांनी शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनावर गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.