दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत आज आळंदी शहर मंडळाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमातून समाजातील वंचित व दिव्यांग घटकांबद्दल सन्मान, प्रोत्साहन आणि आत्मविश्वास वाढविण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हभप अजय महाराज जोशी यांनी भूषविले. मंडलध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वी झाला. या सन्मान सोहळ्यात दिव्यांग बांधवांचा पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी संजय घुंडरे पाटील, रामदास भोसले,अशोकराव टेमघरे, हभप ज्ञानेश्वर महाराज जाधव, आशाताई गायकवाड, अभिषेक उमरगेकर, आकाश जोशी, बालाजी कांबळे, श्रध्दा वाघमारे तसेच शहरातील पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना हभप अजय महाराज जोशी म्हणाले,”दिव्यांग हा शब्द वापरून आपण त्यांना अपूर्ण मानत नाही तर त्यांच्या जीवनातील विशेष सामर्थ्याची दखल घेतो. प्रत्येक दिव्यांगामध्ये देवाने दिलेले एक वेगळे कौशल्य असते. समाजाने त्यांच्या हातात हात घालून त्यांना उभारी दिली तर ते देखील कुणापेक्षा कमी नाहीत, हे अनेक उदाहरणांमधून सिद्ध झाले आहे.
यावेळी संजय घुंडरे पाटील म्हणाले की “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वंचित घटकांसाठी विविध योजना राबवून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून दिला आहे. त्यांचा वाढदिवस सेवा पंधरवड्याच्या रूपात साजरा करणे म्हणजे त्यांचे कार्य पुढे नेण्याचा एक प्रयत्न आहे. दिव्यांग बांधवांना केवळ मदतीची गरज नाही तर प्रोत्साहनाची आवश्यकता आहे. त्यांच्यातील कला, क्षमता आणि धैर्य पाहून आपण त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. आळंदी शहर मंडळाच्या माध्यमातून हा उपक्रम होत असल्याचा मला अभिमान आहे.
समाजातील सर्वांनी दिव्यांग बांधवांसाठी आधारस्तंभ बनले पाहिजे, हाच या उपक्रमाचा खरा उद्देश आहे. कार्यक्रमाचे संयोजन ज्ञानेश्वर रायकर, अनिल वाघमारे, शामशेठ कोलन, रेणुकादास पांचाळ, मनोहर दिवाणे यांनी केले. सर्वांच्या सहकार्यामुळे सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.



