गडचिरोली पोलिसांनी घातपाताचा डाव उधळला…. — नक्षल्यांनी पुरून ठेवलेली स्फोटके जप्त……

 

प्रितम जनबंधु

संपादक 

              प्राप्त माहितीनुसार, पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने नक्षल्यांनी कोरची तालुक्यातील बेळगाव घाट जंगल परिसरात जमिनीत पुरून ठेवली होती. ही स्फोटके शोधून काढण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली नक्षलविरोधी अभियान पथकाने स्फोटके जप्त करण्याची कारवाई केली आहे.

            नक्षलवाद्यांच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त २१ सप्टेंबरपासून सप्ताहाला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नक्षलवादी सक्रिय झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना धमकीचे पत्रक, नंतर सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भामरागडमध्ये हिंदेवाडा रस्त्यावर कापडी फलक लावून नक्षल्यांनी उघड आव्हान दिले होते.

             कुरखेडा उपविभागाअंतर्गत बेडगाव पोलीस मदत केंद्र हद्दीत पुराडा पोलीस ठाण्यातील जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते. कोरची व टिपागड दलमच्या नक्षलवाद्यांनी मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले असल्याची माहिती मिळाल्यावर ‘डीएसएमडी’ उपकरणाद्वारे जंगल परिसरात शोधमोहीम राबवली. त्यानंतर एक संशयितस्थळी बीडीडीएस पथकाला पाचारण केले. घटनास्थळी जमिनीत अंदाजे दीड ते दोन फूट खोल स्फोटक पदार्थ भरून असलेले ४ पाकीट आढळून आले. त्यात ११.८ किलो स्फोटके होती. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही स्फोटके नष्ट केली. 

            पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान) अनुज तारे, कुमार चिंता, यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुराडा ठाण्याचे सहायक निरीक्षक भूषण पवार व जवानांनी ही कारवाई केली. बेळगाव ठाण्यात गुन्हा नोंद केला असून तपास उपनिरीक्षक लक्ष्मण अक्कमवाड तपास करीत आहेत.