Home Vidarbha “येंगलखेडा येथील शासकीय शंकरपट करिता आरक्षित जागेवर अतिक्रमण :- माजी सरपंचांसह ग्रामस्थांची...

“येंगलखेडा येथील शासकीय शंकरपट करिता आरक्षित जागेवर अतिक्रमण :- माजी सरपंचांसह ग्रामस्थांची तहसीलदारांकडे तक्रार… — ७ दिवसांत कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा”…

     राकेश चव्हाण 

तालुका प्रतिनिधी कुरखेडा 

      तालुक्यातील मौजा येंगलखेडा येथील सर्वे क्रमांक २०१ च्या शासकीय (महसूल विभाग) शंकरपट सार्वजनिक वापराच्या जागेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोप करत माजी सरपंच श्री.पंढरी पुराम व इतर ग्रामस्थांनी,तहसीलदार कुरखेडा यांच्याकडे दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी लेखी अर्ज सादर केला होता.  

      सौ.सिंधुबाई काशिनाथ कुमरे यांनी शासकीय जागेवर पक्के राहते घर आणि JIO कंपनीचे मोबाईल टॉवर बांधले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

      अर्जानुसार,सर्वे क्र.२०१ (क्षेत्रफळ ४.०५ हेक्टर) ही शासकीय जमीन शंकरपट करिता,पशुवैद्यकीय दवाखाना,अंगणवाडी,पाण्याची टाकी,आठवडी बाजार,BSNL टॉवर,आदिवासी धान्य गोदाम,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे खेळाचे पटांगण आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आरक्षित आहे. 

       तरीही सिंधुबाई कुमरे यांनी ही जागा स्वतःची मालकीची समजून २०१९-२०२० मध्ये घर व JIO टॉवरचे बांधकाम केले. त्याचबरोबर त्यांच्या शेत सर्वे क्र.१९५ च्या जमिनीवरून JIO कंपनीला भाडेतत्त्वावर टॉवरसाठी करार दिला असून मासिक भाडे घेत असल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.

       ग्रामपंचायत व भूमी अभिलेख कार्यालयाने २०२३-२४ मध्ये केलेल्या मोजणीत हे अतिक्रमण स्पष्ट झाले होते.त्यानुसार अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस देणे आवश्यक होते,परंतु सरकारी यंत्रणेकडून आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. 

      याचा फायदा घेत डिसेंबर २०२५ मध्ये सिंधुबाई कुमरे यांनी शाळेच्या पटांगण व प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आरक्षित जागेवर अंदाजे ०.४० हेक्टर क्षेत्रात मका लागवड केली असून सिमेंटचे खांब लावले आहेत.यामुळे शेजारील शेतकऱ्यांचा बैलबंडी व ट्रॅक्टरचा मार्गही बंद झाला आहे.

       अर्जात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, “सरकारी यंत्रणा कारवाई करत नसेल तर एक दिवस जनता ‘चले जाओ’ म्हणेल.जनता मालक आहे आणि अधिकारी सेवक आहेत.यामुळे मालकाचे अधिकार कुचलेले जाणे योग्य नाही.

     ”दिलेल्या अर्जावर अद्यापही शासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.अतिक्रमण धारकावर सात दिवसांत कोणतीही कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

        अर्जदारांनी सहपत्र म्हणून ७/१२ उतारा व नकाशा जोडला आहे.या अर्जाची प्रत जिल्हाधिकारी गडचिरोली,जिल्हा पोलीस अधीक्षक,उपविभागीय अधिकारी कुरखेडा,उपविभागीय पोलीस अधिकारी,संवर्ग विकास अधिकारी,पोलीस निरीक्षक पुराडा व कुरखेडा यांना माहितीसाठी पाठविण्यात आली आहे.

        ही बाब गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय जमिनींवरील अतिक्रमण आणि प्रशासकीय दुर्लक्षाकडे लक्ष वेधणारी ठरली आहे.तहसीलदार कार्यालयाकडून लवकरात लवकर कारवाई होईल की ग्रामस्थ उपोषणावर उतरतील,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.