शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुकातंर्गत मौजा नेरी येथील पिएचसी चौकाचे अखेर छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव देऊन नामकरण करण्यात आले.
याप्रसंगी ढोल ताशांच्या गजरात डिजे लावुन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
नेरी येथील सुप्रसिद्ध पिएचसी चौक अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले होते अनेकांनी अतिक्रमण केल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळलेला होता.अतिक्रमणाने चौकाचे सौंदर्यिकरण बिघडले होते. दरम्यान नेरी ग्रामपंचायतने अतिक्रमण हटाव मोहीम राबवुन येथील अतिक्रमण हटविल्याने या चौकाने सुटकेचा निःश्वास सोडला.
या चौकालगत प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने लोकांकडून पिएचसी चौक म्हणुन नाव पडले. आता नेरी ग्रामपंचायतचे वतीने अधिक्रुतपणे एका ठरावानिसी या चौकाचे नामकरण करुन छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव देण्यात आले. आता चौकाला या नवीन नावाने संबोधल्या जाणार असुन यामुळे चौकाच्या सौंदर्यात भर पडल्याचे दिसून येत आहे.
शिवजयंतीचे औचित्य साधून दुभाजकाच्या मधोमध राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेची पूजा करून शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी गावच्या प्रमुख महीला सरपंच रेखाताई नानाजी पिसे, उपसरपंच चंद्रभान कामडी,ग्रा प सदस्य पिंटु खाटीक, संदीप पिसे, निखिल पिसे,पद्मश्री नागदेवते,संगीता कामडी, भाजपा महिला तालुका अध्यक्ष माया नन्नावरे,व्यापारी युनियन अध्यक्ष रविंद्र पंधरे, शिवजयंती महोत्सव समिती सदस्य गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



