बावडा येथे तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत.

 

बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर  प्रतिनिधी 

 

      बावडा येथे संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दुपारच्या मुक्कामासाठी ग्रामस्थानी शुक्रवारी (दि.23) जोरदार स्वागत केले. बावडा येथील दुपारचा मुक्काम संपवून पालखी सोहळा सराटीकडे रात्रीच्या मुक्कामासाठी सायंकाळी रवाना झाला.

      पालखी सोहळ्याचा गुरुवारी रात्रीचा मुक्काम इंदापूर शहरात होता. इंदापूर येथील मुक्काम संपवून पालखी सोहळ्याने शुक्रवारी सकाळी बावड्याकडे दुपारच्या विसाव्यासाठी प्रस्थान ठेवले. इंदापूर येथून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे पालखी सोहळ्यासोबत पायी चालत बावड्या पर्यंत सहभागी झाले. पालखी सोहळा विठ्ठलवाडी, वडापुरी, रामवाडी, शेटफळ पाटी, सुरवड, वकिलवस्ती मार्गे बावडा येथे दुपारच्या मुक्कामासाठी दाखल झाला. प्रवासा दरम्यान गावोगावच्या लोकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बावडा येथे पालखीचे उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, विकास पाटील, मनोज पाटील, अनिल पाटील, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे आदींनी स्वागत केले. त्यानंतर बावडा ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन बाजारपेठेतून बाजारतळावरती उभारण्यात आलेल्या शामियाण्यात आणली. याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पालखीस खांदा दिला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांचे रत्नाई निवासस्थानी हजारो वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले.

     तसेच हर्षवर्धन पाटील यांनी परंपरेनुसार देहू संस्थांन व पालखी सोहळ्याच्या अध्यक्ष व विश्वस्तांचा सत्कार केला. तर बाजारतळावरती हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील या उभयतांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी निहार ठाकरे, अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील उपस्थित होते. बावडा येथील दुपारचा मुक्काम संपवून पालखीने सायंकाळी सराटीकडे प्रस्थान ठेवले.