दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आगामी आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू–आळंदी पालखी मार्गावरील सर्व विकासकामे १५ मेपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. देहू व आळंदी संस्थानांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या संयुक्त बैठकीत विविध मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत प्रशासनामार्फत ठोस कार्यवाही करण्याची ग्वाही देण्यात आली.
देहू ते देहू रोडदरम्यानच्या पाच किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील तीन किलोमीटर तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील दोन किलोमीटरचे काम संबंधित संस्थांकडून पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले. देहूरोड कॅन्टोन्मेंट मंडळाच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठपुरावा केला जाणार आहे. देहू येथील मंदिरापर्यंतचा सुमारे ५०० मीटर रस्ता नगरोत्थान योजनेतून पूर्ण करण्यात येणार आहे.
संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डी येथे होत असल्याने जागेअभावी तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी संयुक्त पाहणीचे निर्देश देण्यात आले. काळभोर नगर ते आकुर्डी मेट्रोचे काम पालखीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, लोणी काळभोर येथील मुक्कामासाठी जागा वाढविण्यात येणार आहे. गवळ्याची उंडवडी, सणसर व निमगाव केतकी येथील मुक्कामाच्या जागेचा प्रश्नही प्रशासनामार्फत सोडविण्यात येणार आहे.
आळंदी संस्थानाच्या मागण्यांनाही बैठकीत प्राधान्य देण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील संचेतीपासून एफ.सी. रोडपर्यंत अखंडित प्रकाश व्यवस्था ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. बोरावके मळा ते सासवडदरम्यानच्या बायपास मार्गावरील अडथळे दूर करण्यात येणार असून, दिवेघाट येथे आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात येतील. पालखी मार्गावर वाहने बंद पडल्यास कोंडी टाळण्यासाठी पालखीसमवेत क्रेनची व्यवस्था ठेवण्याची दक्षता प्रशासन व पोलिसांकडून घेतली जाणार आहे.
निरा येथील जुना पूल तातडीने पाडण्याचे आदेश देण्यात आले. आळंदीतील प्रलंबित रस्त्यांची कामे, निधी उपलब्धता तसेच पिंपरी-चिंचवड हद्दीपर्यंतच्या मोठ्या रस्त्यांच्या कामांना गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. आळंदी नगरपालिका क्षेत्रातील रस्ते रुंदीकरणाची कार्यवाहीही वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
परतीच्या वारीदरम्यान आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल देहू व आळंदी संस्थानांच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी तसेच संत तुकाराम महाराज संस्थान देहू आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आळंदी यांचे पदाधिकारी उपस्थित होते.



