निवासी व जबरानज्योत धारकांना कायमस्वरूपी मालकी हक्क पट्टे देण्याची,”वंचित बहुजन आघाडीची मागणी.. — तहसीलदार चिमूर यांना निवेदन देतांना चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे यांच्यासह अनेक पदाधिकारी होते उपस्थित..

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

        स्वत:सह कुटुंबातील सदस्यांच्या उपजिविकेसाठी ग्रामीण भागातील भुमिहीन आणि अल्पभूधारक नागरिकांनी पडित शासकीय जागेवर जबरानज्योत करुन सातत्याने मशागत करीत आहेत तथा शासकीय किंवा इतर जागेवर निवाऱ्याचे बांधकाम करून कुटुंबासह राहात आहेत.

         अशा जबरानज्योत धारकांना व निवारा धारकांना कायमस्वरूपी मालकी हक्क पट्टे देण्यासंबंधाने ग्रामसभेच्या माध्यमातून परत एकदा ठराव मागून चिमूर तालुक्यासह चिमूर विधानसभा मतदारसंघातील व चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व जबरानज्योत धारकांना कायमस्वरूपी मालकी हक्क पट्टे देण्यात यावे,अशा आशयाची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांद्वारे चिमूर तहसीलदार यांच्या माध्यमातून शासन-प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

             निवेदनात म्हटले आहे की,प्रत्येक शासकीय गायरान जमिनी वरती निवास बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांना व शेती मशागत करिता शेतजमीन उपयोगात आणलेल्या सर्व लाभार्थ्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे.

            निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूरचे जिल्हा उपाध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात व शंकरपूर डोमा जिल्हा परिषद क्षेत्राचे प्रमुख शैलेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार चिमूर यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

          चिमूर तालुक्यासह शंकरपूर-डोमा जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत मौजा शंकरपूर येथील कायम निवासी असलेल्या भूमीहीन शेतमजूरांना व दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना स्वतःच्या मालकीची जागा निवासाकरिता उपलब्ध नसल्याने त्यांनी सरकार मालकीच्या गायरान जमिनीवर आपापले अतिक्रमण करून निवासी बांधकाम केलेले आहे व आपल्या कुटुंबासह राहात आहेत,अशा कुटुंब धारकांना निवासी जागेचे कायमस्वरूपी पट्टे देणे आवश्यक झाले आहे.

         तद्वतच स्वत:सह कुटुंबातील सदस्यांच्या उपजिविकेसाठी शेतमजुरांना व अल्पभूधारकांना स्वतःच्या मालकीची आवश्यक शेतजमीन नसल्यामुळे त्यांनी सरकार मालकीच्या गायरान जमिनीवर व इतर जमीनीवर पूर्वजाचे काळापासून जबरानज्योत करुन शेती करीत आहेत व शेतीच्या मशागती अंतर्गत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत.

       अशा भूमिहीन शेतमजूर व दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना निवासा संदर्भात तसेच अतिक्रमित शेत जमिनीवरील ताबाहक्काबाबत कोणतीही बाधा निर्माण होऊ नये याकरिता संबंधिताची मोका चौकशी करून त्यांना कायमस्वरूपी मालकीहक्काचे पट्टे देण्यात यावे,ही मुख्य आणि महत्त्वपूर्ण मागणी निवेदनात नमूद केली आहे.

         निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूरचे जिल्हा उपाध्यक्ष अश्विन मेश्राम,सामाजिक कार्यकर्ते अरविंद सांगोळे सुध्दा आवर्जून उपस्थित होते.