भद्रावतीच्या सोनल टाकीज चौकात आढळले नवजात मृत अर्भक…

उमेश कांबळे ता प्र भद्रावती :

       शहरातील जंगल नाका परिसरात मुख्य रस्त्यावरील डिव्हायडर मध्ये मंगळवारी सकाळी एक नवजात मृत अर्भक आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मृत अर्भक हे पुरुष जातीचे आहे. सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत आवश्यक ती कारवाई करीत पंचनामा केला व मृत अर्भकाला पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले.

         प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास शहरातील जंगल नाका परिसर, एचडीएफसी बँके जवळच्या परिसरात एका कुत्र्याने हे मृत अर्भक तोंडात पकडून आणले होते. नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला असता कुत्र्याने हे अर्भक तेथेच टाकून पळ काढला. शहरात नवजात अर्भक सापडल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरताच एकच खळबळ उडाली. नवजात अर्भक सापडण्याची ही तिसरी घटना असून याआधी चंडिका मंदिराजवळ एक जिवंत नवजात अर्भक सापडले होते. त्याअगोदर नगरपालिकेच्या घंटा गाडीमध्ये एक मृत अर्भक आढळले होते. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.