कनेक्ट ट्री या उपक्रमांतर्गत शहरातील वृक्षांचे जिओ टॅगचे काम सुरू…

दिनेश कुऱ्हाडे

 प्रतिनिधी

पुणे : आजच्या आधुनिक जगात, जिथे शहरीकरण, उद्योग आणि ग्लोबल वॉर्मिंग झपाट्याने विस्तारत आहे, तिथे झाडे वाचविणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने कनेक्ट ट्री या उपक्रमांतर्गत शहरातील वृक्षांचे जिओ टॅगचे काम सुरू झाले आहे.

आतापर्यंत 500 हून अधिक वृक्षांचे टॅगिंग झाले असून, त्यामध्ये वृक्षाची संपूर्ण माहिती, रोपण कधी केले आणि कोणी केले, याची माहिती गुगलवर एका क्लिकवर कळणार आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाच्या पुणे नॉलेज क्लस्टरच्या प्रिन्सिपल सायंटिफिक अ‍ॅडव्हायझर ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने ‘कनेक्ट ट्री’ उपक्रम सुरू केला गेला आहे.

 

डॉ. अनिता काणे यांच्या संकल्पनेवर आधारित श्रेयस खाडे आणि दिशा सावंत यांच्या सहकार्याने तसेच अथर्व पाठक आणि इतर सहकारी यांच्या मदतीने हा उपक्रम सुरू आहे. पुणे शहरात या उपक्रमाची सुरुवात प्रथम औंध येथून केली गेली. औंध, बाणेर पाषाण येथे जवळपास 300 हून अधिक वृक्षांचे जिओ टॅगिंग झाले आहे. या टॅगमध्ये वृक्षाचा प्रकार, कधी आणि कोणी रोपण केले, माहिती कधी संकलित केली आणि त्या वृक्षाची वैशिष्ट्ये, हे सर्व एका क्लिकवर गुगलवर मिळणार आहे. नुकतेच पर्वती येथे एचव्ही देसाई कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मदतीने 150 हून अधिक वृक्षांचे टॅगिंग पूर्ण केले. पुणे महापालिका आणि वन विभागाच्या सहकार्याने आगामी काळात दोन ते तीन वर्षांपूर्वी रोपण केलेल्या वृक्षांची माहिती संकलित केली जाणार आहे.

 

आमच्या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम शहरात सुरू केला आहे. 500 हून अधिक वृक्षांची माहिती संकलित करण्यात आम्हाला यश आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेबरोबर आमचा करार झाला असून, त्यांच्याकडील गेल्या दोन ते तीन वर्षांतील वृक्षारोपण केलेल्या तब्बल साडेतीन लाखांहून अधिक वृक्षांचे टॅगिंगचे काम सुरू करणार आहोत. त्याचबरोबर पुणे मनपा आणि वन विभागाच्या अंतर्गतही काम सुरू राहणार आहे.

– श्रेयस खाडे, पर्यावरणतज्ज्ञ, विश्वस्त, प्रिन्सिपल सायंटिफिक अ‍ॅडव्हायझर ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया