अबोदनगो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
अमरावती :- ऑटोमध्ये गर्दीचा फायदा घेत दोन अज्ञात महिलांनी एका महिला प्रवाशाच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना राजापेठ परिसरात घडली. बस, ऑटो मध्ये अशा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतांना महिलांना लाखोंचा फटका बसत आहेत परंतु या चोर महिलांच्या टोळ्यांना जेरबंद करण्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बस व ऑटोचा प्रवास महिलांना धोकादायक ठरत आहे.
फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती 16 नोव्हेंबर रोजी आपल्या बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी वरूड (जि. अमरावती) येथे गेली होती. लग्नानंतर ती बसने अमरावती बस डेपो येथे आली. सायंकाळी अंदाजे 5 वाजता ती बस डेपोपासून ऑटोत बसून मुलीच्या घरी, राजापेठ येथे जाण्यास निघाली. राजकमल परिसरात ऑटोत गर्दी वाढली आणि त्याचवेळी दोन अनोळखी महिला त्याच ऑटोत बसल्या.
ऑटोत गर्दीअसल्याने फिर्यादीने आधीच ऑटोचालकाला भाडे दिले. ऑटो राजापेठ बस डेपोसमोर थांबला तेव्हा त्या दोन्ही अज्ञात महिला उतरल्या. फिर्यादी कुशल बजाज शोरूमसमोर उतरली. मुलगी तिला घ्यायला आली तेव्हा तिच्या लक्षात आले की तिची मोठी पर्स उघडी आहे. तिने तपासले असता आत ठेवलेली लहान पर्सही उघडी दिसली. त्या लहान पर्समध्ये ठेवलेली दागिन्यांची डबी गायब असल्याचे तिला लक्षात आले.
चोरी गेलेल्या दागिन्यांची किंमत लाखोमध्ये असून चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये 25 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत अंदाजे ₹1,50,000), तीन सोन्याच्या अंगठ्या, एकूण 15 ग्रॅम (किंमत अंदाजे ₹70,000), लहान बाळाच्या दोन अंगठ्या, एकूण 4 ग्रॅम (किंमत अंदाजे ₹28,000), 10 ग्रॅम कानातील दागिने (किंमत अंदाजे ₹55,000) व बाळाचे 1 ग्रॅमचे कानातले (किंमत अंदाजे ₹8,000) असे एकूण अंदाजे ₹3,11,000 किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत.
फिर्यादीच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी कलम 305(सी ), 3(5) बीएनएस प्रमाणे दोन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

