दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची तयारी जोमात सुरू असून, प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख आशिष गोगावले यांनी आपली उमेदवारीची इच्छा जाहीर केल्याने स्थानिक राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे. स्वराज ग्रुपच्या माध्यमातून समाजोपयोगी व लोकाभिमुख कार्य करणाऱ्या गोगावले यांना आळंदीतील तरुण वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या काही वर्षांत गोगावले यांनी धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्य करत स्थानिक नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, तसेच शैक्षणिक सुविधा या मूलभूत गरजांकडे लक्ष वेधून त्यांनी विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केला आहे. तरुणांना एकत्र करून समाजकार्यात सहभागी करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न ‘स्वराज ग्रुप’च्या माध्यमातून यशस्वी ठरत आहे.
गोगावले म्हणाले, “आळंदी हे केवळ तीर्थक्षेत्र नसून वाढत्या लोकसंख्येसह वेगाने विकसित होणारे शहर आहे. येथील विकासकामांसाठी पारदर्शकता, नियोजनबद्धता आणि तरुण नेतृत्व आवश्यक आहे. आमचा प्रयत्न नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला आवाज देण्याचा आहे.”
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उत्तमराव गोगावले व माजी नगरसेविका प्रतिभा गोगावले यांचे चिरंजीव तसेच माजी नगरसेवक रमेश गोगावले यांचे पुतणे असून त्यांचा सामाजिक व राजकीय वारसा घेऊन ते कार्यरत आहे. आळंदी शहरातील विविध सामाजिक उपक्रमांपासून ते धार्मिक सोहळ्यांपर्यंत गोगावले यांची उपस्थिती कायम दिसून येते.
विशेषतः युवावर्गात त्यांनी केलेले सांस्कृतिक व क्रीडा प्रोत्साहनाचे उपक्रम चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली स्वराज ग्रुपने स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे, शालेय साहित्य वाटप, तसेच वृक्षारोपण, वारकऱ्यांना अन्नदान यांसारख्या अनेक उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे.
आळंदी नगरपरीषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मध्ये मतदारांची संख्या वाढली असून, नव्या मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिवसेनेच्या गोटात मात्र गोगावले यांच्या इच्छुकतेमुळे नवसंजीवनी निर्माण झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
राजकीय वर्तुळातही गोगावले यांच्या उमेदवारीकडे संभाव्य दमदार स्पर्धक म्हणून पाहिले जात आहे. त्यांचा अभ्यासू दृष्टिकोन आणि जनसंपर्कातील कौशल्य यामुळे आगामी निवडणुकीत प्रभाग ३ मधील लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.



