राज्यातील 2 हजार 655 अमृत सरोवर स्थळी जागतिक योग दिवस साजरा होणार…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

गडचिरोली ,दि.20: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांची निर्मीती करण्यात आली. या संकल्पनेंतर्गत राज्यात 2 हजार 655 अमृत सरोवर निर्माण झाले आहे. या अमृत सरोवरां स्थळी बुधवार दिनांक 21 जून रोजी जागतिक योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त, रविंद्र ठाकरे यांनी केले आहे. 

प्रधानमंत्री मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (युनो) सर्वसाधारण सभेत दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करावा, अशी संकल्पना मांडली होती. त्यानुसार २१ जून हा जगभर आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा होत आहे. त्यामुळे भारतीय योग पध्दती जागतिक स्तरावर पोहचण्यास मदत झाली आहे.  

 जागतिक योग दिवस संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे आवाहन केंद्र शासनाने केले आहे. यावर्षीची थीम ‘वसुधैव कुटूंबकम’ असून दिनांक 21 जून 2023 रोजी राज्याच्यावतीने अमृत सरोवराच्या स्थळी जागतिक योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. 

  अमृत महोत्सवानिमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवराच्या निर्मीतीच्या उद्दिष्टापेक्षाही राज्यात जास्त अमृत सरोवरांची निर्मीती झाली आहे. हा परिसर पर्यावरणदृष्ट्या अत्यंत सुंदर, शांत, प्रसन्न असल्यामुळे योग साधना करण्यासाठी योग्य ठिकाण आहे. हा परिसर निसर्ग व आध्यात्मिक एकरुपतेचे उत्तम प्रतिक असल्यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिवस येथे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा स्तरावरुन नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. योगदिनाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक गावाच्या शाळेतील योग व क्रीडा शिक्षकांच्या मदतीने आशा सेविका, एएनएम, अंगणवाडी सेविका, बचत गटाचे सभासद, भजन मंडळ, ग्रामसेवक, गाव परिसरातील नागरिकांच्या सहभागाने योगदिन साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गट विकास अधिकारी व तहसिलदार यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाची छायाचित्रे http://mahaegs.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पाठविण्यात यावे, असे आवाहन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे राज्याचे आयुक्त, रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.