Home देशविदेश महामानवांच्या जयंत्या आणि जातीयता…..

महामानवांच्या जयंत्या आणि जातीयता…..

    आपल्या देशात आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे,याचा अर्थ विषमतावादी व्यवस्था आहे.आर्थिक विषमतेची सहा मजली इमारत आहे.दारिद्र्य,गरीबी,कनिष्ठ मध्यमवर्ग,वरिष्ठ मध्यमवर्ग,श्रीमंत,गर्भश्रीमंत( भांडवलदार,जमीनदार ). असे हे सहा मजले,या मजल्यांना पायऱ्या आहेत,आणि लिफ्ट पण आहे, ज्यांना ज्या मजल्यावर लिफ्टने जायचे आहे,ते जाऊ शकतात.

       पण त्यासाठी विशेष चातुर्य पाहिजे,ते म्हणजे मोह,अती स्वार्थबुद्धी,आणि लोकांना धोका देणे,टोप्या गळणे,ओरबाडणे, अती व्याज लावणे,साठेबाजी काळाबाजार,सत्तेचा गैरवापर हे गुण ज्यांच्याकडे आहेत,त्यांनाच कोणत्याही मजल्यावर केंव्हाही कसेही जाण्याची परवानगी किंवा विशेष सवलत या विषमतावादी आर्थिक व्यवस्थेत आहे.

        ज्यांच्याकडे प्रामाणिकपणा आहे,जे विश्र्वासघातकी नाहीत,ज्यांना टोप्या घालता येत नाही,ज्यांना सत्तेचा गैरवापर करणे जमत नाही,किंवा तशी त्याची इच्छाच नाही,अशा प्रामाणिक नेक,सज्जन व्यक्तीसाठी मात्र वरच्या मजल्यावर जाण्याची परवानगी असली तरी अशी माणसे लिफ्टने जाणे नाकारतात,आपली बुध्दी मन शरीर साबुद निरोगी ठेवण्यासाठी व्यायामाची आवश्यकता आहे.

       म्हणून असे नेक प्रामाणिक विश्वासू माणसे लिफ्ट चे ऐवजी पायऱ्यानीच वरच्या मजल्यावर जाणे पसंद करतात.

       आपल्या देशात जशी आर्थिक विषमता आणि विषमतेची व्यवस्था,आणि विषमतावाद आहे,तशीच सामाजिक विषमतेची व्यवस्था आहे.ही व्यशामता कशी आहे ? हे बाबासाहेबांनी जातीयते ची उतरंड असे या व्यवस्थेस नाव दिले.

       या उतरंडीचे वैशिष्ट्ये किंवा नियम असे आहेत की,लहान मोठे मडक्यांची ही उतरंड आहे, श्रेष्ठ कनिष्ठ,उच्च नीच,हा भेदभाव या उतरंडीत आहे.

        साऱ्यात मोठे मडके जे आहे,ते बुडाशी असून त्यावरच वरील सारी मडके आहेत.साऱ्यांचा आधार मोठे मडके आहे,ते वरील सर्वांचे ओझे सहन करीत असते.सगळ्यांपेक्षा बुडाच्या मोठ्या मडक्यात जास्त ताकद आहे,ही ताकद जसे जसे वरचे मडके तसे तसे कमी होत जाते,याचा अर्थ सगळ्यात कमी ताकदीचे मडके म्हणजे उतरंडीवरचे सर्वात वर बसलेले छोटेसे गाडगे आहे.परंतु बुद्धीने ते चतुर असल्याने सर्वांच्या डोक्यावर ते बसले आहे.

       जातीयतेच्या उतरंडीचे आणखी एक वैशिष्ट्ये ( वैगुण्य ) हे की,वरचे मडके खालच्या मडक्यास कनिष्ठ,नीच समजते,आणि स्वतःस खालच्या पेक्षा स्वतःस श्रेष्ट उच्च समजते,म्हणून उच्च निचतेची म्हणजेच विषमतेची ही जातीयत्तेची सामाजिक उतरंड आहे.या साऱ्या मडक्याना आपली जागा बदलता येत नाही,ते एकमेकावर फीट बसलेले असतात.

       यांना वर जाण्यासाठी किंवा खाली उतरण्यासाठी पायऱ्या किंवा सीडी पण नाही.त्यामुळे जिथे आहेत तिथेच राहण्याशिवाय पर्याय नाही.अशीही जातीयत्तेची उतरंड होय. 

        साडे सहा हजार जातीच्या मडक्यांची ही उतरंड आहे.सामाजिक विषमतेची ही उतरंड आहे.या उतरंडीत अनेक दोष असल्यामुळे विषमतेची ही उतरंड फोडून टाकून समता स्थापित करण्याचा प्रयत्न आपल्या देशात बऱ्याच महामानवांनी केला,यात महर्षी,महात्मे,महापुरुष ,संत आहेत.त्यांच्या जयंत्या आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने आणि ,,धूमधामपणे करतो,त्यासाठी हजारो रुपये खर्च करतो,अन्नदान रक्तदान

पुस्तकदान,कपडे दान, द्न्यानदान अशी अनेक दान करून या महामानवप्रती आपण कृतज्ञता,प्रेमभाव,निष्ठा,आपल्यावर असलेले त्यांचे उपकाराची परतफेड,आपले कर्तव्य,त्यांचा त्याग,विचाराचे दर्शन व्हावे या हेतूने महामानवाच्या जयंत्या करीत असतो.

        ही एक आनंदाची,स्वाभिमानाची,पराक्रमाची,उद्दात भावना विचाराची बाब आहे,स्वागतार्ह आहे,कौतुकाची आणि प्रसन्नतेचि,प्रशंसा करण्याची गोष्ट आहे.

        परंतु या जयंत्या आपणास आपल्या महामानवाच्या विचाराकडे नेणाऱ्या नाहीत,तर त्यांच्या विचारांचे विरुद्ध दिशेने नेणाऱ्या आहेत.कारण या महामानवांचे विचार हे संकीर्ण संकुचित नव्हते तर,अत्यंत व्यापक उद्दात सखोल आणि आकाशा एव्हढे उंच होते,त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू जात धर्म वर्ग नव्हता,तर त्यांचे टार्गेट हा माणूस होता,माणुसकी होती,मानवता होती.सर्व विश्वाचे कल्याण करण्याची त्यांची भूमिका होती,विश्रांती हा त्यांचा ध्यास आणि श्वास होता.

       केवळ माणूसच नव्हे तर पशु पक्षी वृक्ष यांच्या जीविताचे रक्षण पालन पोषण आणि माणसांचे कल्याण हे त्यांचे ध्येय होते.ते केवळ जात धर्म वर्ण पंथ अशा डबक्यात अडकून पडले नाहीत,उलट अश्या छोट्या छोट्या दणक्यातून माणसाला बाहेर काढून त्याला विशाल समुद्रात कसे आणण्याचे ? त्याचे बांधलेले पंख मोकळे करून त्यास मोकळ्या खुल्या वातावरणात उंच आकाशात कशी भरारी घेता येईल यासाठी त्यांनी देह झिजविला.अपार कष्ट सहन केले,यासाठी काहींना जीव गमवावा लागला.

        तेंव्हा कुठे आपणास समतेची वाट सापडली.या जयंत्या समतेच्या वाटेने जाण्यासाठीच साजरा करायच्या असतात.आनंदाची ही पर्वणी म्हणून जरूर नाचणे,गाणे,आणि कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम जरूर करावे,पण ते करत असताना आपण उलट्या दिशेने तर चाललो नाहीत ना ? याचे भान असणे जरुरीचे आहे.

        संत,महर्षी,महात्मे, महामानव हे सारे महापुरुष यांनी विषमतावादी व्यवस्था नष्ट करून समतेची आर्थिक सामाजिक समता स्थापन करण्याच्या ध्येयाने झपाटून आपला देह झिजविला,हे आपणास माहित आहे,हे आपण ऐकतो,वाचतो,भाषणे करतो परंतु या समतावादी महापुरुषांना आपण आपल्या जातीसाठी वापरतो,ही मोठी घोडचूक होत आहे.अर्थात मते मिळवण्यासाठी म्हणूनच त्या त्या जातीचे राजकीय कार्यकर्ते नेते असे वर्तन करताना दिसतात.

       पण आपला स्वार्थ यातून साधून घेणे म्हणजे महापुरुषांचे उतुंग असे व्यक्तिमत्व संकुचित करणे होय.महामानवांनी केवळ आपल्याच जातीसाठी नव्हे तर सर्वच जातीधर्माच्या लोकांसाठी कार्य केले आहे,हे परत परत ठासून सांगण्यात आपण कमी पडलो.महामानवांनी आपल्यासाठी काय काय केले ? हे केवळ आपल्याच जातीचे लोक जमवून न सांगता सर्वच जातीच्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही.

        ज्या जातीचे जे महर्षी,संत,महात्मे,महामानव,tyach जातीने त्यांची जयंती न करता , ती सार्वजनिक जयंती म्हणून साजरी केली पाहिजे.

       जयंतीमंडळात सर्वच जातीचे प्रतिनिधी आणि वर्गणी साऱ्याच जातीची,असे मुद्दामपणे केले पाहिजे.सर्वच जातीचे लोक आधी या जयंतीच्या निमित्ताने एकत्र येतील,एकत्र एका सतरंजीवर बसतील,ही पहिली कृती असेल,त्यानंतर भाषणे ऐकून ते सहभोजनास तयार होतील,जातीयत्तेने काय नुकसान होते आहे,अस्पृश्यता देशाला कलंक आहे, रोटी बंदी आणि बेटी बंदी चे दुष्परिणाम कसे घडताहेत,यामुळे सामाजिक दृष्ट्या जगात आपली आणि आपल्या देशाची कशी मानहानी होते आहे ? हे या जयंतीच्या भाषणातून आणि कृती कार्यक्रमातून होत राहील,असे घडणे म्हणजेच आपण समतेची जी वाट धरली आहे,त्या वाटेवर मागे न जाता पुढे पुढे जात आहोत,याची प्रचिती येईल.

       आणि विषमतावादी व्यवस्था नष्ट होऊन समतावादी समाज रचनेचे या महामानवांचे ध्येय पूर्ण होईल.जे आपल्यासाठीच होते.

     लेखक :- दत्ता तुमवाड…

       सत्यशोधक समाज नांदेड….

दिनांक 21 एप्रिल 2025.फोन : 9420912209.