निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी…वसंत मोरेंच्या पोस्टने चर्चांना उधाण.. — वसंत मोरे पुणे लोकसभा निवडणुक लढवनारच…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर पुण्यातील वसंत मोरे यांनी अद्यापही कोणत्याही पक्षात अधिकृतरित्या पक्ष प्रवेश केलेला नाही. परंतु, गेल्या काही दिवसांत त्यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले वसंत मोरे हे सध्या पुण्यातील राजकारणामधील हॉट टॉपिक बनले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या एका वक्तव्याचीही चर्चा होतेच. अशातच आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

              वसंत मोरे हे महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत, असे त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात आले आहे. परंतु, अद्याप तरी मविआकडून योग्य ऑफर न मिळाल्याने याबाबतची कोणतीही चर्चा पुढे होऊ शकलेली नाही. पण आता फेसबुकवर एक व्हिडीओ आणि त्याला सूचक कॅप्शन देत मोरेंनी पोस्ट शेअर केली आहे. “तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते बघोतच मी…” असा मजकूर असलेली एक पोस्ट वसंत मोरे यांनी काल रात्री उशिरा फेसबुकवर केली. या पोस्टमध्ये वसंत मोरे यांनी एक व्हीडिओ शेअर केलाय. या व्हीडिओला असणारं बॅगराऊंड म्युझिक बरंच काही सुचवू त आहे. देखीये जी ये शहर है तुम्हारा लेकीन इस शहर में दबदबा है हमारा…, असं बॅकग्राऊंड असणारा व्हीडिओ आणि पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे.

             वसंत मोरे हे गेल्या काही महिन्यांपासून मनसे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पक्षाच्या अनेक कार्यक्रमांपासून त्यांनी स्वतःला लांब ठेवले होते. त्यातच त्यांनी मागील महिन्यात पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. पण ही भेट कामासाठी असून ती राजकीय भेट नव्हती, असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. पण या भेटीच्या 15 दिवसांतच त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा व इतर पदांचा राजीनामा दिला. ज्यानंतर त्यांनी मविआच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढवल्या. ज्यामुळे ते मविआतीलच कोणत्या तरी एका पक्षात प्रवेश करणार, असे निश्चित झाले आहे. पण आता त्यांनी काल केलेल्या या फेसबुक पोस्टमुळे मविआकडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो, पण वसंत मोरेंनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.