सर्वांनी एकजूट ठेवा,एकजूट फुटू देऊ नका :- मनोज जरांगे पाटील..  — मनोज जरांगे पाटील यांचे अलंकापुरीत भल्या पहाटे ३ वाजता जंगी स्वागत..

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

पुणे:-

    आळंदी : जीव गेला तरी हरकत नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे आणि ते आपण घेतल्याशिवाय राहणार नाही. यासाठी सर्वांनी एकजूट ठेवा,एकजूट फुटू देऊ नका,असे आवाहन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आळंदी येथे केले. 

         आळंदी येथील चाकण चौकात पहाटे दोन वाजता मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मनोज जरांगे-पाटील यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत व फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले.यावेळी आळंदी व पंचक्रोशीतील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

        मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा समाजातील लेकरांचे कल्याण होणार आहे.परंतु आरक्षणामध्ये राजकारण आणू नका. दि.२४ डिसेंबरपर्यंत सरकार आपल्याला आरक्षण देणार आहेच. परंतु, नाही दिलं तर आपण पुढील लढाई लढायला तयार राहणार आहोत.

        मराठा संघर्ष योद्ध्याला पाहण्यासाठी रात्री ९ वाजल्यापासून चाकण चौकात असंख्य मराठा बांधवांनी गर्दी केली होती. जरांगे पाटील यांचे पहाटे दोन वाजता अलंकापुरी नगरीत आगमन झाले. प्रदक्षिणा मार्गावरून त्यांची मिरवणूक काढण्यात आली मिरवणूकीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे झाले.

         मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जमलेल्या लोकांची गर्दी पाहून जरांगे पाटील भारावून गेले. आळंदीत मुक्काम करून सकाळी नऊ त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला यश मिळो अशी माऊली चरणी प्रार्थना केली.

          आळंदी देवस्थानच्या वतीने विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. माऊलींचे दर्शन घेऊन ते तुळापूरकडे मार्गस्थ झाले. यावेळी आळंदी पोलिस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.