Home Maharashtra अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांबाबत आवश्यक नुकसान भरपाई महाराष्ट्र सरकार देणार काय?,”सध्यातरी शेतकऱ्यांच्या...

अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांबाबत आवश्यक नुकसान भरपाई महाराष्ट्र सरकार देणार काय?,”सध्यातरी शेतकऱ्यांच्या प्रती सरकार उदासीन! — शेतकऱ्यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे नियमानुसार अर्ज करावे… — शेतकऱ्यांनी आपल्याकडे पिक नुकसानीचे व्हिडिओ किंवा फोटो ठेवावे…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक..

       माहे आगष्ट व सप्टेंबर २०२५ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र राज्यातील धान,कपास,सोयाबिन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.यामुळे राज्यातील शेतकरी हताश झाले असून महाराष्ट्र सरकारकडे आर्थिक मदतीसाठी अपेक्षा ठेवून आहेत.

      धान,सोयाबीन,कपास उत्पादक सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये सरसकट मिळावे असे त्यांचे म्हणणे आहे.

     अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी,शेतकऱ्यांना परिसरातील संबंधित सरकारी विभाग किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतमाल नुकसानीचे पंचनामे केले पाहिजे.

              कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे नुकसानभरपाईसाठी अर्ज कसे करावे,आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील आणि पात्रतेचे निकष काय आहेत,याबद्दल मार्गदर्शन करतील. 

          तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या तहसील कार्यालयात किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधा.ते तुम्हाला नुकसानभरपाई प्रक्रियेबद्दल माहिती देतील.नुकसानीची नोंद करा,तुमच्या शेतात किंवा घरात झालेल्या नुकसानीची तपशीलवार नोंद ठेवा.फोटो आणि व्हिडिओ पुरावे महत्त्वाचे ठरतील. 

अर्ज करा…

       सरकारी पोर्टल किंवा संबंधित विभागाच्या कार्यालयात नुकसानभरपाईसाठी अर्ज करा.आवश्यक कागदपत्रे सादर करा,शेतजमिनीच्या नोंदी,नुकसानीचे पंचनामे अहवाल,फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रे जमा करा.

नियम व अटी तपासा…

        नुकसानभरपाई मिळवण्यासाठी शासनाने निश्चित केलेले नियम व अटी तपासा आणि लक्षात ठेवा,नुकसानभरपाईची प्रक्रिया शासनाच्या धोरणांवर आणि मदतीच्या घोषणांवर अवलंबून असते.त्यामुळे,अधिकृत सरकारी सूचनांवर शेतकऱ्यांनी लक्ष ठेवावे.

        अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्यास पिके सडतात कारण जमिनीतील हवा विस्थापित होते,ज्यामुळे वनस्पतींच्या मुळांना ऑक्सिजन मिळत नाही. या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मुळे श्वसन करू शकत नाहीत.अतिवृष्टीमुळे पोषक तत्वांचे शोषण कमी होते आणि शेतातील पिके कुजायला लागतात.याव्यतिरिक्त,जास्त आर्द्रता आणि पाणी साचल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो,ज्यामुळे पिकांचे नुकसान होते आणि ते सडतात. 

            पाणी साचल्याने जमिनीतील हवा बाहेर पडते आणि मुळांच्या क्षेत्रात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते.यामुळे मुळे शेतातील पिके श्वसन करू शकत नाहीत आणि कुजतात.मुळांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यास ती कुजायला लागतात,ज्यामुळे पिकाची वाढ खुंटते आणि शेवटी ते मरतात. 

         बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त पाणी आणि आर्द्रता असल्यामुळे होते.यामुळेच शेतमालावर बुरशी आणि जिवाणूंची वाढ होते.

         सततच्या पावसामुळे मातीची धूप होते आणि मातीतील महत्त्वाची पोषक तत्वे वाहून जातात,ज्यामुळे पिकांची वाढ खुंटते.

         अतिवृष्टीमुळे धान पिकाचे अनेक प्रकारे नुकसान होते,जसे की,धान्य सडणे व कुजणे,शेतात पाणी साचून राहिल्याने धान पिकाच्या वाढीवर परिणाम होतो,पीक सडते व कुजते,उत्पादनात घट होते.पावसामुळे पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनात लक्षणीय घट होते.

         याचबरोबर शेतात पाणी साचल्यामुळे पिकांना आवश्यक असलेला सूर्यप्रकाश व हवा मिळत नाही,त्यामुळे त्यांची वाढ खुंटते. 

         अतिवृष्टीमुळे खते वाहून जातात आणि बियाणे खराब होतात,ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

       अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतात आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होते.तद्वतच इतर समस्यांचा डोंगर त्यांच्या पुढे आवासून उभा ठाकतोय.

      शेतकरी नुकसानभरपाईची मागणी करतात,कारण पिकांचे नुकसान झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसतो.

        अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार असल्याचे बोलले जात आहे.यासाठी नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत.

        मात्र,काही शेतकऱ्यांचे पंचनामे अद्याप बाकी असल्याने,नुकसानभरपाई त्यांना मिळणार काय?हा प्रश्न आहे.

        कृषी विभागामार्फत तुमच्या शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे केले जातील.पण,बाधित भागातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळायला हवी.

       ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टीमुळे ज्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या धान,कपास,सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे,त्यांना तातडीने मदत केली जाईल,अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली असली तरी त्या माहितीला सध्यातरी महत्व नाही.

       सततच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिके पिवळी पडली,रोगांचा प्रादुर्भाव झाला आणि शेंगा लागल्या नाहीत,अशा विविध समस्या शेतकऱ्यांसमोर आहेत.

        तद्वतच अतिवृष्टीमुळे कपाशीच्या झाडांची वाढ खुंटली असून बुरशीजन्य रोगांसह इतर रोगांचा प्रादुर्भाव कापाशीवर झाल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत…

        महाराष्ट्र सरकार सध्यातरी शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे असेच म्हणावे लागेल…