असे राजकारण?…. — आणि सर्व वश?…

 

  संपादकीय

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

           कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता राजकारण हे सर्व समाज घटकातील नागरिकांच्या उन्नतीचे केंद्र असावे आणि यातंर्गत देश सार्वभौमत्व सक्षम ठरावा असे भारतीय संविधानाची उद्देशिका स्पष्ट करते आहे.

          मात्र,अलिकडच्या काळात भारत देशातील राजकारण्यांनी जनतेचा चुराडा करणाऱ्या मानसिकता बनविल्या असून पक्षहितासाठी सर्व काही करणे हाच त्यांचा कर्मयोग बनलेला दिसून येतो आहे.

           राजकारणाची परिभाषा ही समानतेचा कार्य दुरदृष्टीकोण अबाधित राखण्यासाठी व समतातंर्गत बंधुत्वला सर्व समाज घटकातील नागरिकांच्या मनात रुजविण्यासाठी आहे.

             आशावादी समाज निर्माण करताना त्या त्या समाजातील नागरिक हे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व वैचारिक दृष्ट्या स्वाभिमानी बनवीने हे राजकारण्यांचे परंम दायित्व असते.

          याचबरोबर सर्व समाजातील नागरिक-विद्यार्थी हे शैक्षणिक दृष्ट्या व प्रशासकीय दृष्ट्या मागासले राहू नये आणि औद्योगिक दृष्ट्या मागे पडू नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी सातत्याने संवेदनशील राहिले पाहिजे यासाठीच त्यांची लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या माध्यमातून खासदार व आमदारांच्या स्वरूपात लोकप्रतिनिधी म्हणून निवड केली जाते.

           मात्र,राजकारण्यांनी आता उलटा खेळ सुरु केलाय.खासदार व आमदार बनायचे असेल तर येनकेन प्रकारे समाजातील नागरिकांना लाचार पणाची सवय लावली पाहिजे व लाचार सवयीच्या माध्यमातून त्यांना मतापुरते नेहमी वश केले पाहिजे अशा पद्धतीचा त्यांच्या कार्याचा प्रामुख्याने मुख्य भाग दिसतो आहे. 

        म्हणूनच आर्थिक आणि इतर प्रकारची मदत करताना संबधित गरजू व्यक्ती बरोबर नित्यनेमाने फोटो काढले जातात व दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्राला मदत केली असल्याचे रखाणे उमटलेली असतात आणि त्यात मदत करणेवाल्यांचा भलताच आव व थाट असतो.

           स्वाभिमानी व स्वावलंबी समाज निर्माण करण्यापेक्षा मदती अंतर्गत लाचार समाज निर्माण करणाऱ्या राजकारण्यांचा उदेश खासदार किंवा आमदार होणे हा असेल तर अशा व्यक्तींच्या डोक्यात भ्रष्टाचाराची किड सुध्दा अगोदरच घुसलेली असणार हे नाकारता येत नाही.

             आमदार व खासदार झाल्यावर खासदारांनी लोकसभेत व आमदारांनी विधानसभेत,”त्यांनी सर्व समाजाच्या आर्थिक,शैक्षणिक,सामाजिक,औद्योगिक,प्रशासकीय व राजकीय उन्नती संबधाने व सहभागा संबधाने किती मुद्दे उपस्थित केले याबाबतीत ते जनतेला तारखेसह सांगितल काय?हा खरा कळीचा मुद्दा आहे.मात्र,यावर ते अजिबात भाष्य करणार नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे.कारण त्यांनी अशा प्रकारचे समतोल अभ्यासपूर्वक मुद्दे लोकसभा व विधानसभेत उपस्थित केलेले नसणार एवढे पक्के असणार..

             मात्र भोळ्याभाबड्या मतदारांच्या आयुष्याचा व त्यांच्या भविष्यांचा एका अयोग्य रननीती अंतर्गत कायमचा चुराडा केला जातो याचे भान हरपून बसलेले नेते स्वाभिमानी व स्वावलंबी समाज कधीच निर्माण करु शकत नाही हेही तितकेच वास्तव आहे. 

           केंद्र सत्तेचा व राज्यसत्तेचा उपयोग हा भारतीय नागरिकांच्या सर्वकश उन्नतीसाठी व सर्वंकश सुरक्षेसाठी केला पाहिजे हेच सत्तेचे खरे रुप आहे.

            मात्र,लोकहितार्थ उदेशान्वये जनतेच्या निशाण्यावर सरकारे असण्यापेक्षा,ज्या पक्षाचे सरकारे असतात त्या पक्षाच्या विचारसरणी अंतर्गत सरकारच्या निशाण्यावर नागरिक असल्याचे सध्यातरी भारत देशात दिसून येते आहे.

       प्रादेशिक पक्षांचे व राष्ट्रीय पक्षाचे नेते वंशवाद,धर्मवाद,जातीवाद,या उद्देशाला अनुसरून काम व कार्ये करीत असतील तर ते भारत देशासाठी व भारत देशातील नागरिकांसाठी काम व कार्ये निष्ठापूर्वक करीत नाही हे उघड आहे. 

        असे नेते व त्या नेत्यांचे राजकारण हे देशातील नागरिकांना त्यांच्या कुठल्याना कुठल्या उदेशात गुरफटून ठेवणारे असल्याने त्यांच्या डावपेचातील लंब्याचौड्या बातातंर्गत राजकीय प्रवास हा नागरिकांच्या अविकसित टार्गेट साठीच असतो,यापुढे त्यांच्या राजकीय प्रवासात दुसरे काही राहात नाही असेही दिसून येते आहे.

             सत्ता उपभोगलेल्या व सत्ताधारी असलेल्या देशातील राजकारण्यांनी भारतीय संविधानातंर्गत सर्वप्रकारच्या भुमिका वटविल्या असत्या व कर्तव्य पार पाडले असते तर भारत देशातील नागरिक आतापर्यंत समृद्ध व सुखी झाले असलेले दिसले असते.तद्वतच जात व धर्माच्या चौकटीत अडकुन पडलेले दिसले नसते. 

          अयोग्य विचारातंर्गत गलिच्छ व तुच्छ राजकारणाचा प्रकार हा देशातील नागरिकांना नेहमी परावलंबी बनवून ठेवण्यासाठी होत असेल तर लाचार व बेसहारा समाज घडविण्यासाठी हे नेते बनलेले आहेत काय?,”की, नेते बनतात? या अनुषंगाने आता सामाजिक स्तरावर मोठे जन आंदोलन होणे आवश्यक आहे.

          कमजोर समाजातंर्गत लाचार मतदार तयार करणे व बेसहारा समाजाचे चित्र रेखाटत त्या समाजाचा उपयोग करून घेणारी कार्यपद्धत मजबूत करणे,हा प्रकारच जिवंत समाजाला मृत्य समाज निर्माण करणारा आहे..

        अशा कार्याचे भयानक वास्तव मतदारांना वश करण्यासाठी होत असेल तर सर्व समाज घटकातील नागरिक वैचारिक दृष्ट्या लुळे व शारीरिक दृष्ट्या पांगळे झाले आहेत असे समजावे का?

       म्हणूनच भारत देशातील राजकारणी हे मतांसाठी गलिच्छ व तुच्छ राजकारण करून अख्या समाजाच्या स्वाभिमानाला व स्वावलंबनाला गिळंकृत करतात यासारखे भारत देशातील मतदारांचे दुसरे दुर्भाग्य कोणते असणार?.