दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील घुंडरे आळी परिसरात दि.19 फेब्रुवारीला एक मोठा कंटेनर थेट धर्मशाळेच्या आवारात घुसल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र धर्मशाळेच्या भिंतीचे व परिसरातील मालमत्तेचे नुकसान झाले आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घुंडरे आळी हा अरुंद आणि वर्दळीचा मार्ग आहे. तरीही अवजड वाहने या मार्गाने जात असल्याने नागरिकांकडून वारंवार आक्षेप नोंदवले जात होते. आजच्या घटनेने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर सरळ धर्मशाळेकडे वळला आणि भिंत तोडत आत शिरला. सुदैवाने त्या वेळी परिसरात गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही तत्काळ पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र, या अपघाताने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे.
परिसरातील रहिवाशांनी ‘मोठी अवजड वाहने जाऊ नयेत’ यासाठी तातडीने उंची मर्यादा दर्शविणारे हायट बॅरिगेट्स बसवावेत, अशी ठाम मागणी केली आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये, अन्यथा पुढील वेळी मोठी जीवितहानी होऊ शकते, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहीवाशी प्रा.श्रीधर घुंडरे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस पावले उचलली गेली तरच अशा अपघातांना आळा बसू शकतो, हेच या घटनेतून स्पष्ट झाले आहे.



