दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : अलंकापुरीनगरीत दिवाळीच्या प्रकाशात राजकारणाचा रंग अधिक खुलू लागला आहे. येऊ घातलेल्या आळंदी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक नगरसेवकांनी सणाचा आनंद आणि जनसंपर्क यांचा सुरेखदिवाळीचा मेळ साधत नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
पारंपरिक दिवाळी भेटीगाठींच्या निमित्ताने उमेदवारांनी आपल्या प्रभागातील नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधत आशीर्वाद, शुभेच्छा आणि पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रत्येक गल्लीत, रस्त्यावर आणि चौकात शुभेच्छा बॅनर, पोस्टर आणि फलक झळकत आहेत. अनेक इच्छुक उमेदवारांनी घराघरांत जाऊन नागरिकांना शुभेच्छा देतानाच त्यांच्या स्थानिक समस्या, विकास कामांची गरज आणि अपेक्षा जाणून घेतल्या. काही ठिकाणी नागरिकांच्या अडचणींवर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन देत उमेदवारांनी आपला जनसंपर्क अधिक दृढ केला आहे.
दिवाळी निमित्ताने अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन करून इच्छुकांनी आपली उपस्थिती ठळकपणे जाणवून दिली. अनेक इच्छुक उमेदवार स्वतःचे माहीतीपत्रक, दिवाळी भेट, आकाशकंदील, उटणे, पणत्या, मिठाई, दिवाळी फराळ वाटप नागरिकांना करत आहे. तर कुठे बचत गट महिलांचा सन्मान — अशा विविध उपक्रमांतून जनतेशी जोडलेपण वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, दिवाळीच्या निमित्ताने शहरात झालेल्या “दिवाळी पहाट”, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कीर्तन सोहळ्यांनाही राजकीय रंग चढला आहे. इच्छुक नगरसेवकांनी या कार्यक्रमांत हजेरी लावत नागरिकांशी थेट संवाद साधला. या भेटीगाठींमुळे राजकीय वातावरण अधिक तापू लागले असून, आगामी निवडणुकीची चाहूल प्रत्येक नागरिकाला जाणवू लागली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सणाच्या या उत्सवी वातावरणात उमेदवारांच्या संवादामुळे स्थानिक प्रश्नांवर चर्चा होण्याची संधी मिळत आहे.
रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, कचरा व्यवस्थापन आणि विकास आराखड्यांबाबत नागरिक आपली मते मांडत आहेत. दिवाळीचा प्रकाश जसा शहर उजळवतो आहे, तसाच राजकीय वातावरणालाही उजाळा मिळाला आहे. इच्छुक उमेदवारांनी शुभेच्छा कार्यक्रमांच्या माध्यमातून निवडणुकीच्या रणांगणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत.



