अबोदनगो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
अमरावती :- अंधश्रद्धा आणि जुन्या रूढी-परंपरांच्या नावाखाली नवजात बालकावर अघोरी पद्धतीने उपचार करून त्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना चिखलदरा तालुक्यातील लाखेवाडा गावात घडली आहे. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या २३ दिवसांच्या नवजात बाळाला पोटदुखी व उलटीचा त्रास होत होता. यावेळी नमूद आरोपी महिलेने “गावठी इलाज” म्हणून जुन्या चालीरीती आणि रूढी-परंपरेनुसार अघोरी उपचार करण्याचे सांगितले.
तथापि, उपचाराच्या नावाखाली तिने बालकाच्या पोटावर “डमा”चटके देऊन त्याला जखमी केले. या प्रकारामुळे बालकाच्या त्वचेवर भाजल्याचे व्रण निर्माण झाले असून, आईने दिलेल्या जबानीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.
चिखलदरा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०२५ (जुना) नोंदविण्यात आला असून, आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ चे कलम ३(२) तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३२४ आणि बी.एन.एस. कलम १८(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चिखलदरा पोलिसांकडून सुरू असून, पोलिसांनी नागरिकांना अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या अशा “अघोरी उपचारांपासून” सावध राहण्याचे आवाहन केले आहे.


