Home Social आळंदी नगरपरिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्काराने राजेश कराळे यांचा गौरव…

आळंदी नगरपरिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्काराने राजेश कराळे यांचा गौरव…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : आळंदी नगरपरिषदेच्या वतीने प्रथमच आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा सोहळा दिमाखात पार पडला. शैक्षणिक वर्ष २०२५ या वर्षीचा पहिला आदर्श शिक्षक पुरस्कार राजेश बाळासाहेब कराळे यांना मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या हस्ते प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना रोख रक्कम १० हजार रुपये, प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

          या कार्यक्रमाला डी.डी.भासले पाटील, संजय घुंडरे, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, दिनेश घुले, सागर भोसले, अशोकराव उमरगेकर, श्रीमती शैला तापकीर, विनोद कांबळे, सचिन काळे, संदेश तापकीर, राहुल चव्हाण, आदित्य घुंडरे, आकाश जोशी, पांडुरंग वहिले, अनिल घुंडरे, अनिल वाघमारे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षण विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          या पुरस्कारामागील उद्देश शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणे, शिक्षकांना प्रेरणा देणे, शैक्षणिक गुणवत्तावृद्धी साधणे तसेच समाजात शिक्षकांचा मान वाढवणे हा आहे. पुरस्कारासाठी शिक्षकांची सलग सेवा, प्रशिक्षण, विद्यार्थ्यांचा यशदर, उपक्रमांतील सहभाग, संशोधन कार्य, शालेय प्रगतीसाठी केलेले विशेष प्रयत्न, चारित्र्य, सचोटी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शिस्त व सामाजिक बांधिलकी हे घटक विचारात घेण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी खांडेकर यांनी सांगितले.

         यावेळी नगरपरिषदेतील पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. कर विभागातील भैरवनाथ काळे व श्रीमती मयुरी पाटोदकर यांचा विशेष गौरव झाला. तसेच १५ ऑगस्टनिमित्त विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या २० विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.