गडचिरोली पोलिसांनी घेतला ४० लाखांच्या तीनशे मोबाईलचा शोध.. — नागरिकांनी मानले पोलीस प्रशासनाचे आभार….

प्रितम जनबंधु

संपादक 

          गेल्या दशकभरात माणसाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक बनलेल्या ‘मोबाईल’ चोरीचे व हरविल्याच्या दररोज देशभरात लाखो तक्रारी येतात. अनेकदा चोरी गेलेला मोबाईल सापडतदेखील नाही. मात्र, गडचिरोली पोलिसांनी मागील दोन वर्षांत ‘स्मार्ट’ शोध घेत तब्बल ४० लाख किमतीचे जवळपास तीनशे मोबाईल नागरिकांना परत केले. त्यामुळे मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांनी गडचिरोली पोलिसांचे आभार मानले आहे.

              सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात यावर्षी शोधण्यात आलेले मोबाईल संबंधित नागरिकाला प्रदान करण्यात आले. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे, कुमार चिंता, यातिश देशमुख, सायबर पोलीस प्रभारी उल्हास भुसारी, पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत हरवलेले मोबाईल संबंधिताला परत करण्याचा एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आलेल्या ६४ व्यक्तींना मोबाईल परत करण्यात आले.

           हरवलेले मोबाईल सापडल्याने संबंधितांनी आनंद व्यक्त करीत गडचिरोली पोलिसांचे आभार मानले आहे. हरवलेले किंवा चोरी गेलेले मोबाईल शोधण्यात मागील दोन वर्षांत गडचिरोली पोलिसांचा आलेख वाढता असून २०२२ मध्ये २२ लाख किमतीचे १५० तर २०२३ मध्ये आत्तापर्यंत १८ लाख किमतीचे १३५ मोबाईल शोधण्यात त्यांना यश आले आहे. त्यामुळे एकदा हरवलेला मोबाईल सापडत नाही, ही भावना मनातून काढून टाकत तात्काळ तक्रार केल्यास मोबाईल परत मिळू शकतो, असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी यावेळी सांगितले. सोबतच सायबर गुन्हेगारांपासून जनतेने सावध राहावे असेही आवाहन केले.