दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
खेड : खेड तालुक्याची ओळख, परंपरा आणि अस्मितेशी जोडलेले श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत तसेच तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मागण्यांचे निवेदन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना दिले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, श्रीक्षेत्र भीमाशंकर हे खेड तालुक्याचाच अविभाज्य भाग म्हणून कायम राहावे, यासाठी स्वर्गीय नारायणराव पवार यांनी सातत्याने संघर्ष केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून या विषयावर सातत्याने पाठपुरावा सुरू असून, भीमाशंकर खेडमध्येच कायम राहावे, अशी भूमिका स्थानिकांकडून सातत्याने मांडली जात आहे.
अलीकडे शिखर समितीच्या बैठकीत “भीमाशंकर खेड-आंबेगाव” असा उल्लेख करण्याबाबत चर्चा झाल्याने खेड तालुक्यातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. शासनाच्या अधिकृत कार्यवृत्तात अशा उल्लेखाची नोंद झाल्यास भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात तसेच खेड तालुक्याच्या अस्मितेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यासोबतच खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेतरस्ते योजना, जिल्हा परिषदेमार्फत विविध विकासकामे, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती, शाळांसाठी वर्गखोल्या, अंगणवाड्या, महावितरण अंतर्गत ट्रान्सफॉर्मर तसेच पीएमआरडीए अंतर्गत विविध विकासकामांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली.
खेड तालुक्याच्या जनभावनांचा आदर राखून या विषयात योग्य स्तरावर हस्तक्षेप करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे मोहिते पाटील यांनी केली.


