Home Maharashtra मौजा चिमूर तालुक्यात रोजगार हमी योजनेतील कामांअभावी मजूर हवालदिल… — रोजगार...

मौजा चिमूर तालुक्यात रोजगार हमी योजनेतील कामांअभावी मजूर हवालदिल… — रोजगार हमींची कामे सुरु करण्याची उपसरपंच अशोक चौधरी यांची मागणी…

शुभम गजभिये

विशेष प्रतिनिधी…

        चिमूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये यावर्षी रोजगार हमी योजना अंतर्गत पुरेशा प्रमाणात कामे उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. शासनाच्या चुकीच्या व ढिसाळ नियोजनामुळे तसेच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील शेकडो मजूर बेरोजगार झाले असून त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. 

         शेतीची कामे मर्यादित असताना रोजगार हमी योजना हीच गरीब,शेतमजूर,विधवा महिला,भूमिहीन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचा मुख्य आधार असते.मात्र यावर्षी कामे सुरू न झाल्यामुळे अनेक मजूर हवालदिल झाले आहेत.

         रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्ते दुरुस्ती,नाला खोलीकरण,तलाव स्वच्छता, वृक्षलागवड, शेततळी,जलसंधारण यांसारखी विविध विकासकामे गावपातळीवर सुरू होणे अपेक्षित होते.

        परंतु अनेक प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळत नाही.ग्रामपंचायत व संबंधित कार्यालयांच्या वारंवार चकरा मारूनही मजुरांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.

        उन्हाळ्याच्या तीव्र परिस्थितीत रोजगार नसल्याने अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.घरखर्च, मुलांचे शिक्षण,औषधोपचार व दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले असून काही मजूर रोजगाराच्या शोधात स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत.

         शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक मजुरांचे आर्थिक नुकसान झाले असून “या नुकसानाची भरपाई कोण देणार?” असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे. 

        गरीब मजुरांच्या हाताला वेळेवर काम मिळाले असते तर त्यांच्यावर ही बिकट परिस्थिती ओढवली नसती,अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

        या संदर्भात मजुरांच्या हितासाठी आवाज उठवत मौजा शंकरपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी शासन व प्रशासनाकडे तात्काळ रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची मागणी केली आहे.

       “ग्रामीण भागातील गरीब मजुरांच्या हाताला काम मिळाले नाही तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल.त्यामुळे प्रलंबित कामांना त्वरित मंजुरी देऊन गावागावात रोजगार उपलब्ध करून द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.