शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत,”हर नल हर घर,जल योजनेचे गेल्या अडीच वर्ष अगोदर 22 डिसेंबर 2022 ला नामदार गुलाबराव पाटील मंत्री पाणीपुरवठा महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते भूमिपूजनचा कार्यक्रम करून शंकरपूर ग्रामस्थांना,”हर घर नल हर घर,जल मिळेल असे सांगण्यात आले होते.
या योजने करिता मौजा शंकरपूर गावा करिता अंदाजे 700 लक्ष निधी मंजूर केले व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागाच्या देखरेखाली कंत्राट मे.ज्योती कंट्रक्शन कंपनी चंद्रपूर यांना दिले.
कामासाठी गेल्या अडीच वर्षांपासून शंकरपूर गावातील रस्ते व भूमिगत गटारे फोडून ठेवल्याने गावातील नागरिकांना आवागमन भयंकर त्रास आहे.
शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत शंकरपूर गावात अंदाजे सात कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आणि पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले.सदर कामाचे कंत्राट ज्योती कंट्रक्शन कंपनी चंद्रपूर यांना झाला.
प्रत्येक कुटुंबांना पाणीपुरवठा करण्यासाठी गावभर सिमेंट रस्ते,भूमिगत गटारे फोडून पाईपलाईन टाकली.मात्र,अंदाजपत्रकानुसार रस्ते व झालेले नुकसान जसेच्या तसे बनवून देण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे.
गावातील लोकांना गेल्या अडीच वर्षापासून फोडलेल्या रस्त्यामुळे त्रास होत आहे.त्यामुळे ग्रामपंचायत ने लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
मात्र,संबंधित काम ग्रामपंचायतचे नसून ग्रामपंचायत इतका मोठा बोजा सहन करू शकत नाही.कंत्राट दाराकडून फोडलेले कांग्रेट रस्ते व भूमिगत गटारे दुरुस्त करण्याचे काम दीर्घ काळापासून प्रलंबित आहे.
संबंधित कंत्राट दाराने काम सुरू करून गावातील रस्ते फोडून ठेवले आहे.त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.यासंदर्भात अनेक पत्र व्यवहार केले आहेत,तरी देखील सदर कंत्राटदारावर चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा कोणतेही कारवाई करीत नाही.
गावातील वाहतुकीस अडथळे निर्माण होतात,तसेच पावसामुळे साचणाऱ्या पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होणार असल्याचे संकेत आहेत.कंत्राटदारासी अनेक दिवसांपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे,त्यांच्या सोबत संपर्क होणे दुरापास्त झाले आहे.
संबंधित विभाग या कंत्राटदाराशी हात मिळवणी करून नागरिकांना भूलथापा देण्याचा प्रयत्न करीत आहे.गावात झालेले काम अंदाजपत्रकानुसार झाले नाही,पाईप बरोबर वापरले नाही,रेती-सिमेंट निकृष्ट दर्जाचे वापरले गेले आहे,याची माहिती संबंधित विभागाला पत्राद्वारे देऊन सुद्धा कंत्राटदारावर कारवाई केली नाही.
याचा अर्थ असा होतो की संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी कंत्राटदाराशी हात मिळवणी केली आहे.
याचबरोबर अनेक काम अंदाजपत्रकानुसार करायला पाहिजे,पण अंदाजपत्रकानुसार कामे होताना दिसून येत नाही.या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अभियंत्यांवर व कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक चौधरी व ग्रामस्थ यांनी केली आहे.
येत्या पंधरा दिवसात घरपोच पाणी न मिळाल्यास शंकरपूरगावचे समस्त महिला संबंधित विभागासमोर घागर मोर्चा घेऊन आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला आहे.


