शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहे म्हणून सर्वकाळ देशबांधवांच्या हिताचा विचार करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे सर्वार्थाने वेगळेपण जपणारे असल्याने त्यांची जयंती साजरी करतांना नुसता जल्लोष करून भागणार नाही तर बाबासाहेबांच्या स्वप्नातील प्रगल्भ समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी सुद्धा अंगिकारली पाहिजे मात्र जयंती साजरे करण्याचे स्वरूप झपाट्याने बदलत असून नाचण्याच्या जल्लोषात वाचण्याची संस्कृती लोप पावत आहे त्यामुळे ज्याने वर्षभर बाबासाहेब वाचला त्यालाच नाचण्याचाही नैतिक अधिकार आहे असे परखड बोल प्रसिद्ध साहित्यिक व उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध अधिवक्ता भूपेश वामनराव पाटील यांनी उसेगाव येथे आयोजित बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोहात काढले.
चिमूर तालुक्यातील नेरी जवळ असलेल्या उसेगाव येथे संबोधी बुद्ध विहार यांच्याकडून महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या समारोहात भीम गीतांचे आयोजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, प्रबोधनात्मक चर्चासत्र असे भरगच्च आयोजन करण्यात आले होते.
या दोन दिवसीय जयंती महोत्सवाचे उद्घाटन १४ एप्रिल २०२५ रोजी प्रखर आंबेडकरी वक्ते भूपेश पाटील यांच्याकडून करण्यात आले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी सुरेश डांगे, भारतीय बौद्ध महासभेचे नारायण कांबळे, रामचंद्र गेडाम हे हजर होते. या प्रसंगी उद्घाटक यांचेकडून ध्वजारोहण करण्यात आले व तदनंतर ॲड. भूपेश पाटील यांनी समता सैनिक दलाच्या महिला तुकडीच्या पथसंचलनाचे निरीक्षण केले व मानवंदना स्वीकारली त्यानंतर आयोजित उदघाटक सत्राचे प्रमुख वक्ते म्हणून आपले विचार व्यक्त करतांना ॲड. भूपेश वामनराव पाटील म्हणाले की जयंती करणार असाल तर ती एक दिवसाची नसते.
जयंती साजरी करणाऱ्याला पुढच्या रोजच्या दिवसाचं व्रत घ्यावं लागतं. ज्या महामानवांची जयंती आपण करतोय क्षणोक्षणी नव्याने जन्म घेतला. मिनिटामिनिटाला व्यवस्था बदलवण्यासाठी नवीन पायंडे जन्माला घातले, एक दिवस जयंती करून ऋणातून मुक्त होता येत नाही. हा शॉर्टकट मारता येत नाही. तुम्ही एक दिवसाची जयंती करा किंवा न करा, तुम्हाला महामानवांच्या ऋणातून मुक्त होता येत नाही. तुमच्या जगण्याला ज्यांनी अर्थ दिला, त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी खारीचा का होईना वाटा उचलणे, त्यासाठी रोजच्या रोज मरण्याची तयारी ठेवणे ही जयंती आहे.
या दिवशी तुम्ही झोकून देण्याचा संकल्प करण्यासाठी जयंती साजरी करणार असाल तरच जयंती साजरी करण्याला अर्थ आहे. एक दिवस सलामी आणि इतर दिवशी गुलामी यासाठी जयंती करणार असाल तर तुम्ही बाबासाहेबांना फसवत आहात एक दिवसाची जयंती आणि इतर दिवशी विश्रांती, ते बाबांचं लेकरू असू शकत नाही.
ते आईबापाला धोका देणारं लेकरू होय. आईबाप अशा लेकराला माफ करू शकत नाहीत. आजवर आपण जयंतीच साजरी केली. बाबांनी जे आपल्याला दिलं ते आपण राखू शकलो नाही. नेत्यांना दोष देऊन मोकळं होणं हे आपलं निर्ढावलेपण आहे. आपण बाबांची पुस्तकं वाचली नाहीत तर आपण इतरांना काय सांगणार असा प्रश्न त्यांनी अत्यंत मार्मिक शब्दात उपस्थित समुदायाला केला. या महोत्सवाचे गावातील सर्व नागरिक प्रबोधनात्मक विचार ऐकण्यासाठी जमलेले होते.



