Home Vidarbha ग्रामीण भागात कचरा गाड्या दिसत आहेत शोभेची वस्तू…

ग्रामीण भागात कचरा गाड्या दिसत आहेत शोभेची वस्तू…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

       गावामध्ये कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होऊ नये घरातील तसेच रस्त्यावरील केर कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीना कचरा गाडी दिल्या गेली तर शंकरपूर या 15000 लोक वस्तीच्या गावात सुद्धा कचरा गाडी असूनही कचरा जमा करण्यासाठी नागरिकांच्या घरापर्यंत कचरा जमा केल्या जात नसल्याने गावात स्वच्छतेचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने डेंगू, मलेरिया, हिवताप, चिकनगुनिया, कावीळ यासारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

       त्यामुळे या कचरा गाड्या मार्फत प्रत्येक घरातील सुका कचरा आणि ओला कचरा या कचरा गाड्या मार्फत जमा करण्यात याव्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. परंतु ग्रामीण भागातील ह्या कचरा गाड्या ग्रामपंचायत मध्ये उभ्या असल्याने कचरा गाडी ही शोभेची वस्तू असल्याचे निदर्शनास येत आहे. 

         चिमूर तालुक्यात बऱ्याच ग्रामपंचायतींना कचरा गाड्या आणि ग्रामपंचायतीमार्फत प्रत्येक घरामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा जमा करण्यासाठी कचराकुंडी दिल्या गेल्या. परंतु कचरा गाडी ही कधीही नागरिकांच्या घरापर्यंत फिरकलीच नाही त्यामुळे ग्रामीण महिला घरातील केरकचरा हा घराजवळील असलेल्या नालीमध्ये फेकतात. त्यामुळे दिलेल्या कचराकुंड्या ही घरातील शोभेची वस्तू ठरत आहे.

       या नालीमध्ये फेकलेल्या कचऱ्यामुळे पावसाळ्यात नाल्यांमधून पाणी वाहून जाण्यासाठी अडचण निर्माण होते आणि तो कचरा नाल्यांमध्येच सडत असल्याने ग्रामीण भागात पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या निर्माण होताना दिसत आहेत. त्यामुळे या समस्येकडे ग्रामपंचायत ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का? कचरा गाडीवर नेमलेल्या ड्रायव्हरचे पगार तसेच कचरा जमा करणाऱ्या मजुराची मजुरी काम न करता कशी दिल्या जाते? यामध्ये भ्रष्टाचार तर होत नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. 

        या घन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत गावाबाहेर सिमेंटचे हौद बांधले गेले परंतु कचरा गाड्यांचा व कचराकुंड्याचा उपयोग होत नसल्याने या घनकचऱ्याच्या हौदाचा काय उपयोग असा प्रश्न निर्माण होत आहे. तालुक्यातील काही मोजक्याच ग्रामपंचायत मध्ये माझं गाव सुंदर गाव ही संकल्पना 100% राबवून कचऱ्याचे व सांडपाण्याची योग्य नियोजन करण्यात येत आहे. परंतु बहुसंख्य ग्रामपंचायत ह्या याला अपवाद ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.