Home Maharashtra श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैल फाउंडेशनकडून लाखोंची शैक्षणिक मदत…

श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैल फाउंडेशनकडून लाखोंची शैक्षणिक मदत…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी :- “कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये” या उदात्त हेतूने कार्यरत असलेल्या शैल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विविध प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व परीक्षा फी अशा प्रकारची एकूण अंदाजे एक लाख रुपयांची मदत करण्यात आली. या उपक्रमातून शेतकरी, शेतमजूर, कामगार, वारकरी संप्रदायातील तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळाला.

        या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय पिशव्या, वह्या, पुस्तके आणि परीक्षा शुल्क यासाठी आवश्यक ती शैक्षणिक मदत दिली गेली. शैक्षणिक गरज ओळखून शैल फाउंडेशनने दिलेला हा मदतीचा हात, विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर करत त्यांना उज्वल भविष्यासाठी नवी उमेद देणारा ठरला.

         कार्यक्रमात शैल फाउंडेशनचे विश्वस्त दिलीप टिकले, बँकिंग तज्ञ मिलिंद आंबेकर, समाजसेविका वृंदा आंबेकर, नुपूर टिकले यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, विद्यार्थी सहायक समिती प्रमुख विठ्ठलदास गुट्टे, प्रज्ञा यादव, समन्वयक सूर्यकांत खुडे, प्रकाश भागवत यांसह अनेक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

        प्रास्ताविक करताना प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांनी दातृत्वाची महत्ता विषद करताना सांगितले की, “ही केवळ मदत नसून विद्यार्थ्यांमध्ये एक संस्कार रोवणारा उपक्रम आहे. शैल फाउंडेशनकडून मिळणारी शैक्षणिक मदत ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनीही याचा आदर्श ठेवत भविष्यात समाजासाठी योगदान द्यावे.”

         संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांनी शैल फाउंडेशनच्या गेल्या १४ वर्षांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल विशेष आभार मानले. त्यांनी सांगितले की, “संस्थेच्या या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणात सातत्य ठेवता आले आहे.”

       यानंतर वृंदा आंबेकर यांनी आपल्या संवादामध्ये एक प्रेरणादायी बोधकथा सादर केली. त्या म्हणाल्या, “जीवनात एकमेकांच्या सहकार्यानेच प्रगती होते. शिक्षण हा समाजासाठी गुंतवणूक आहे.”

         कार्यक्रमाच्या शेवटी दिलीप टिकले यांनी शैल फाउंडेशनच्या कार्याचे उद्दिष्ट सांगितले. “शैक्षणिक गरजूंना पोहचून त्यांना संधी मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे. ज्ञानेश्वर संस्थेच्या माध्यमातून हे काम अधिक प्रभावीपणे घडते, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे,” असे ते म्हणाले.

         कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सूर्यकांत खुडे यांनी केले, तर विठ्ठलदास गुट्टे यांनी उपस्थितांचे आभार मानले. माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.